सुरेंद्र राऊत
यवतमाळ : ग्रामीण भाग अद्यापही आवश्यक आराेग्य सुविधांपासून कोसो दूर असल्याने अजूनही उपचाराच्या अघाेरी पद्धतीचा वापर केला जाताे. यातून भयंकर असे परिणाम पुढे येत आहेत. जिल्ह्यातील आदिवासीबहूल घाटंजी तालुक्यातील दुर्गम गावात असा गंभीर प्रकार घडला. पाच दिवसांच्या चिमुकलीला श्वसनाचा त्रास असल्याने ती सारखी रडत हाेती. ती रात्रभर झाेपत नसल्याने उपाय म्हणून तिला बिब्याचे चटके देण्यात आले. यानंतर तिची प्रकृती आणखी गंभीर झाली आहे. आता तिची यवतमाळ शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.
घाटंजी तालुक्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रात महिलेची प्रसूती झाली. मुलगी झाली तरी राेजमजुरी करणाऱ्या कुटुंबाला माेठा आनंद झाला. सर्वत्र नव्या बाळाचे काैतुक हाेऊ लागले. प्रसूतीदरम्याने मुलीच्या आईला टाके पडल्याने तीन दिवस आराेग्य केंद्रात ठेवल्यानंतर सुटी देण्यात आली. ताेपर्यंत बाळ हसत खेळत हाेते. घरी आल्यानंतर दाेन दिवस बाळाची प्रकृती चांगली हाेती. पाचव्या दिवशी मात्र बाळ काही केल्या झाेपत नव्हते. सारखे धापत हाेते. काळजी पाेटी घरात कुणालाच झाेप नव्हती. कुणीतरी उपाय सांगितला, सर्दी, कफ याचा त्रास असल्याने हे हाेत आहे. त्याला बिबा लावला तर लवकर आराम पडेल. म्हणून हा अघाेरी उपाय करून बघितला.
काेवळ्या मुलीला गरम बिब्याचे चटके देण्यात आले. सलग तीन दिवस उपाय करूनही आराम पडत नसल्याने अखेर चिमुकलीच्या आई-वडिलांनी थेट यवतमाळ गाठले. येथील काही खासगी रुग्णालयात बाळाला दाखविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने एकाही खासगी डाॅक्टरने उपचार करण्याची हिम्मत दाखवली नाही. थेट नागपूरला जाण्याचा सल्ला देण्यात आला. आर्थिक स्थिती नसल्याने आठ दिवसांच्या मुलीला गंभीर अवस्थेत घेऊन आई-वडील शासकीय रुग्णालयात पाेहाेचले. तेथे डाॅक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. तिची प्रकृती अजूनही गंभीर आहे. न्युमाेनिया झाल्याने तिच्या अवयवांवर परिणाम झाला आहे. बिब्याचे चटके दिल्याने शरीरावर जखमा आहेत. चिमुकलीचा जीवन मरणाशी संघर्ष सुरू आहे.