यवतमाळ :
कापसाला दर नसल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची आणखी एक चिंता वाढली असून साठवून ठेवलेल्या कापसामुळे शेतकऱ्यांच्या अंगाला खाज सुटू लागली आहे. जणू कापूस शेतकऱ्याला चावू लागला आहे. एकाच जागी साठवून राहिलेल्या कापसावर डस्ट माइट्स किडीचे आक्रमण झाले आहे. अशा साठविलेल्या कापसाच्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तीच्या अंगाला खाज सुटत आहे.
गतवर्षी कापसाला १२ हजार रुपये क्विंटलचा दर होता. यावर्षी किमान १० हजार रुपये क्विंटल दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात सात महिन्यांचा कालावधी लोटला तरी कापसाला चांगला दर मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांना एप्रिल मध्यापर्यंत कापूस विकता आला नाही. आता या कापसाने शेतकरी कुटुंबात खाजेचा आजार पसरला आहे. यात अंगावर बारीक पुरळ येत आहेत. असह्य वेदनाही होतात. रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या ग्रामीण भागात वाढलेली आहे.
डस्ट माइट्स म्हणजे काय?ही एक काेळीवर्गीय जातीची कीड आहे. धुळीच्या कणाइतकी बारीक याची प्रजाती आहे. ती पटकन दृष्टीस पडत नाही. कापूस आणि डस्टवर ही कीड मोठी होते. यातून हातावर, पायावर, प्रथम लाल बारीक पुरळ येतात.
कापूस साठविलेल्या घरामध्ये किंवा गोदामात धूळ जमा होते. या धुळीवर कोळी ही कीड वाढते. साठवणुकीचा काळ जितका जास्त तितकी डस्ट जास्त होते. त्यावर माइट्सची पैदास वाढते.- डॉ. प्रमोद मगर, कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळखाजीने पुरळ येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. खासकरून ज्यांच्या घरी कापूस साठवला आहे अशाच कुटुंबात हा आजार पसरला आहे. यावर ॲन्टिॲलर्जिक औषधांचा उपचार केला जात आहे. या आजारात पाच ते सात दिवसांच्या उपचारांनंतरच रुग्ण बरे होत आहेत.- डॉ. अनिल नाईक, बोरीअरब, यवतमाळ