लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकावे, त्यांना अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने महादीप परीक्षा घेण्यात येत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना विमानवारी घडत असल्याने महादीप परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे. जिल्ह्यातील १८० केंद्रांवर आयोजित महादीप परीक्षा १७ हजार ७०० विद्यार्थ्यांनी दिली.
यात १७ हजार मराठी माध्यमाच्या व ७०० उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करणारा व जिल्हास्तरावर यशस्वी विद्यार्थ्यांना विमानवारीची भुरळ घालणारी महत्त्वाकांक्षी महादीप परीक्षेची केंद्रस्तरीय फेरी शुक्रवारी घेण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, शिक्षणाधिकारी (योजना) किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी, उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे, उपशिक्षणाधिकारी शिल्पा पोलपेल्लीवार, जिल्हा समन्वयक प्रणिता गाढवे यांच्या मार्गदर्शनात सोळाही तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, साधनव्यक्ती यांच्या नियंत्रणात केंद्रस्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली.
यादरम्यान पर्यवेक्षिय यंत्रणेतील विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे, विस्तार अधिकारी दीपिका गुल्हाने यांनी यवतमाळ तालुक्यातील पांढरी परीक्षा केंद्राला भेट देऊन बैठक व्यवस्था आदी बाबींची पाहणी केली. गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
केंद्रीस्तरीय फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत
- या महादीप केंद्रीस्तरीय फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून केंद्रस्तरीय परीक्षेला गर्दी भारी दिसून आली. यंदाही विमानवारी घडणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले.
- इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा या परीक्षेमध्ये सहभाग होता. भविष्यात स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी टिकावा यासाठी या महत्त्वाकांक्षी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारत असल्याचे दिसत आहे.