यवतमाळ : ऑनलाईन फ्रॉडमध्ये कुठल्या प्रकारे जाळे टाकले जाईल याचा नेम नाही. एका भावाने बहिणीसाठी ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केला. पार्सल घरी पोहाेचले. मात्र ड्रेस खराब निघाला. भावाने तो ड्रेस परत करण्यासाठी कस्टर केअरवर संपर्क केला. यातून भामट्याने बॅँक खात्यातील एक लाख ५४ हजार २७६ रुपये काढून घेतले.
लक्ष्मीकांत रेणुकादास तिवारी रा. शर्मा ले-आऊट कळंब याने आपल्या बहिणीसाठी सॅसरीप डॉट कॉम या साईटवर ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केला. हा ड्रेस खराब निघाला. तो परत करण्यासाठी त्याने मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. संबंधिताने लक्ष्मीकांत याला ऑर्डर कोड विचारला व नंतर लिंकवर ठराविक नंबर टाकण्यास लावला. या माध्यमातून ठगाने थेट लक्ष्मीकांतच्या बॅँक खात्याचा ॲक्सेस मिळविला. स्टेट बँकेच्या खात्यातून एक लाख ५४ हजार २७६ रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लक्ष्मीकांतने कळंब पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून कलम ४२० भादंविसह ६६ ड माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.