यवतमाळ : यवतमाळहून छत्रपती संभाजीनगरसाठी २२ प्रवासी घेऊन निघालेली एसटी महामंडळाची बस कारंजा रोडवरील पाच किमी अंतरावर असलेल्या चिखली फाट्यावर पोहोचल्यानंतर वेडीवाकडी धावू लागली. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर बस थांबली. मात्र, चालक स्टिअरिंगवरच मान टाकून झोपी गेला. प्रवासी तसेच वाहकांनी विचारपूस सुरू केली. तर चालक दारूच्या नशेत आढळला. त्याला धडपणे बोलताही येत नव्हते. अखेर दारव्हा आगाराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चालकाला पोलिसांच्या हवाली केले. वैद्यकीय तपासणीनंतर या चालकाची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.
हा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी घडला आहे. यवतमाळ आगारातून (एमएच ४० सीएम ५१२१) ही बस छत्रपती संभाजीनगरसाठी मंगळवारी सकाळी सुटली. या बसमध्ये चालक म्हणून नारायण मारोती एकुंडवार तर वाहक म्हणून प्रशांत पांडुरंग भगत नेमणुकीस होते. बस पुढे दारव्हा येथून निघून चिखली फाट्यावर पोहोचली असता अचानक वेडीवाकडी धावू लागली. हा प्रकार पाहून प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर बस कशीबशी थांबली. मात्र, गाडीचा चालक पूर्णपणे दारूच्या नशेत होता. रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून त्याने चक्क स्टिअरिंगवरच मान टाकली होती. हा प्रकार पाहिल्यानंतर बसचे वाहक भगत यांनी तत्काळ ही माहिती दारव्हा आगाराला दिली.
अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकास पोलिस स्टेशनला हजर केले. पोलिस स्टेशनला पोहोचल्यानंतरही चालक नारायण एकुंडवार यास नीट उभेही राहता येत नव्हते. त्यामुळे दारव्हा पोलिसांनी त्याची तत्काळ वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत चालक पूर्णपणे मद्याच्या अमलाखाली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दारव्हा पोलिसांनी भादंवि कलम ३०८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चालक नारायण एकुंडवार यास न्यायालयात हजर केले असता त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक नम्रता राठोड, सुनील राठोड, मोहसीन चव्हाण, ओंकार गायकवाड, सुरेश राठोड आदींच्या पथकाने केली.
वाहतूक नियंत्रकांनी तपासणी का केली नाही?
समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन २६ प्रवाशांंचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या ट्रॅव्हल्सचा चालक दारूच्या नशेत होता असे, त्यानंतर झालेल्या चौकशीतून पुढे आले होते. मात्र, त्यानंतरही एसटीतील चालकांची तपासणी होत नसल्याचा गंभीर प्रकार यानिमित्ताने पुढे आला आहे. आगारातून बस बाहेर काढली जाते, त्यावेळी वाहतूक नियंत्रक चालक-वाहक नशेत आहे का, याची तपासणी करतात. यासाठीची यंत्रणाही वाहतूक नियंत्रकांना पुरविण्यात आलेली आहे. मात्र, तरीही ही तपासणी गांभीर्याने होत नसल्याचे दारव्हा येथे घडलेल्या या घटनेतून स्पष्ट होत आहे.