यवतमाळ :वीज बिल थकल्याने तात्पुरता खंडित करण्यात आलेला जिल्हा परिषद शाळांचावीज पुरवठा विद्युत कंपनीकडून पूर्ववत केला जात आहे. विदर्भातील १७५५ शाळांची वीज जोडून तेथील अंधार दूर करण्यात आला आहे. लाखो रुपयांची थकबाकी या शाळांकडे आहे. वीज नसल्याने या शाळांना शैक्षणिक उपकरणे वापरण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
जिल्हा परिषदेच्या शाळांकडील थकीत रक्कम वसूल करण्यासाठी संबंधित यंत्रणेला नोटीस देण्यात आली. यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वसुली मोहिमेअंतर्गत या शाळांची वीज तात्पुरत्या स्वरूपात तोडण्यात आली होती. शासन स्तरावर वीज बिलाबाबत झालेल्या निर्णयानंतर तात्पुरता खंडित करण्यात आलेला शाळांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील १०५७ शाळांची वीज कापण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक शाळा यवतमाळ जिल्ह्यातील आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्याचा क्रमांक लागतो. यवतमाळ जिल्ह्यातील ३९२, अमरावती जिल्ह्यातील ३५८, बुलडाणातील १३२, अकोला १०८ आणि वाशिम जिल्ह्यातील ६७ शाळांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
नागपूर विभागातही शाळांची वीज जोडणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. २३ एप्रिलपर्यंत या विभागातील ६९८ शाळांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ४९, गडचिरोली ८४, भंडारा ४०, गोंदिया ६४, वर्धा ६६ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ९५ शाळांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या जवळपास शाळांकडे वीज बिलाची रक्कम थकीत आहे. मात्र, काही शाळांनी थोड्या फार रकमेचा भरणा केल्याने त्या वीज पुरवठा खंडित करण्यातून सुटल्या होत्या. यवतमाळ जिल्ह्यातील ६३४ शाळांकडे ५४ लाख रुपये थकीत होते. अमरावती जिल्ह्यातील १२६७ शाळा थकबाकीदार ठरल्या होत्या. वीज पुरवठा पूर्ववत झाल्याने शाळांंची विजेअभावी होणारी अडचण दूर झाली आहे.
जिल्हा : वीज पूर्ववत शाळा
अमरावती : ३५८
यवतमाळ : ३९२
बुलडाणा : १३२
अकोला : १०८
वाशिम : ६७
एकूण : १०५७