लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बंद घरेच चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत, असे आतापर्यंत वाटत होते. आता चोरट्यांनी कार्यपद्धती बदलविली असून घरात कुटुंब झोपून असेल तरी चोरटे चोरी करून जात आहे. यवतमाळ शहरात अशा एक नव्हे तर तब्बल १२ घटना घडल्या आहेत. यात लाखोंचा मुद्देमाल चोर नेतात. पायदळ आलेले चोर दुचाकी घेऊन जात आहे. मंगळवारी रात्री वडगाव येथील महाबलीनगरमध्ये चोरट्यांनी दोन घरात खिडकी व दरवाजा तोडून प्रवेश केला. लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. महाबलीनगरमध्ये आतल्या बाजूला असलेल्या घरांना चोरट्यांनी लक्ष केले. त्यांनी सर्वप्रथम नवीन दयालाल खिवंसरा यांच्या घरात प्रवेश केला. त्यासाठी किचनच्या खिडकीला असलेले ग्रील काढून बाजूला ठेवले. नंतर घरात प्रवेश केला. लाकडी व लोखंडी कपाट फोडले. यावेळी खिवंसरा कुटुंबीय पत्नी, दोन मुले हाॅल व बेडरूममध्ये झोपलेले होते. चोरट्यांकडून तोडफोड सुरू असतानाही त्यांना जाग आली नाही. चोरट्यांनी रोख १५०० रुपये, १२० ग्रॅम सोने व एक मोबाईल चोरला. जाताना किचनचे दार उघडून ते बाहेर पडले. तेथून एक घर अंतरावर अभिलाष विनय पांडे यांच्या घरात प्रवेश केला. अभिलाष व त्यांची आई दोघेही हॉलमध्ये झोपलेले होते. चोरट्यांनी पांडे यांच्या घराच्या मागील बाजूचा वॉश एरियात निघणारा दरवाजा तोडला. त्यानंतर घरातील दोन कपाट फोडले. रोख ३० हजार, ३० ग्रॅम सोने, दोन मोबाईल, चांदीची भांडी असा मुद्देमाल गोळा केला. अभिलाषने मोबाईल स्वत:च्या उशी जवळ ठेवले होते. तेथून ते मोबाईल घेतले. हॉलमध्ये की-पॅडला लागून असलेली ॲक्टिव्हाची चाबी घेतली. मागच्या दारानेच बाहेर पडले. जाताना चोरीचा मुद्देमाल भरण्यासाठी घरातीलच एक बॅग रिकामी केली. नंतर मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून ॲक्टिव्हा घेऊन पसार झाले. त्यांनी एमएच-२९-डब्ल्यू-६९२५ क्रमांकाची दुचाकी सोबत नेली. सकाळी खिवंसरा व पांडे कुटुंबीय उठल्यानंतर त्यांना धक्काच बसला. सर्वप्रथम त्यांनी आजूबाजूच्या व्यक्तींना व नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. नंतर डायल ११२ वर तक्रार केली. अवधूतवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच ठसे तज्ज्ञ पथकही दाखल झाले. अंगुली मुद्रा निरीक्षक सुरेश परसोडे, अमित कांबळे यांनी चोरांचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र विशेष असा सुगावा लागला नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
घरात शिरण्यापूर्वी गुंगीचे औषध वापरत असल्याचा संशय - चोरटे प्रचंड तोडफोड करून घरात प्रवेश मिळवितात. त्यानंतरही झोपलेल्या व्यक्तींना जाग कशी येत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांकडून गुंगीच्या औषधाचा वापर केला जात असावा. गुंगी येणारे द्रव्य फवारतात. झोपेतील व्यक्ती आणखी गाढ झोपावी यासाठी हा प्रयोग केला जात असल्याची शंका आहे.
१५ दिवसांत आठ घरे, चार दुकाने फोडली- यवतमाळ शहरातील अवधूतवाडी, शहर व लोहारा पोलीस ठाणे हद्दीत दरदिवसाला घरफोडी, जबरी चोरीसारख्या घटना होत आहे. १५ दिवसांत आठ घरे व चार दुकाने चोरट्यांनी फोडली. यात लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. निखिल दुधे रा. बालाजी सोसायटी, गजानन गोडेकर रा. चौसाळा रोड बालाजीनगर, नीलेश खाडे रा. मोहा, प्रभाकर देशमुख रा. लक्ष्मीनगर यांच्याकडे चोरी झाली. लक्ष्मीनगरमध्ये ४ फेब्रुवारीच्या रात्री परिसरातील चार घर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. १२ फेब्रुवारीला पुष्पकुंज सोसायटीत एकाच वेळी चार दुकाने फोडून मुद्देमाल लंपास केला. दुचाकी चोरीच्या घटनांची तर गिणतीच नाही.