रूपेश उत्तरवार
यवतमाळ : यवतमाळच्या संस्कृतीमध्ये खाद्यपदार्थांचा वाटा मोठा राहिला आहे. बुढीचा कच्चा चिवडा त्यातीलच एक आहे. नागपूरचे सावजी मटण, शेगावची कचोरी... तसा यवतमाळात ‘बुढीचा चिवडा’ फेमस आहे.
बुढी या शब्दामागे यवतमाळच्या माणसाला ‘माय’ हा अर्थही अभिप्रेत असतो. ४० वर्षांपूर्वी सुभद्राबाई मांढरे यांनी लग्न झाल्यानंतर उपजीविकेचे साधन म्हणून कच्चा चिवडा विकण्यास सुरुवात केली. हा चिवडा यवतमाळकरांना इतका भावला की, प्रत्येकजण आझाद मैदानात गेल्यानंतर हा चिवडा खाल्ल्यावाचून राहत नाही. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आजी वरच्यावर चिवडा करून देत असतात. कधी ग्राहक कमी असतात, तर कधी जास्त. कितीही गर्दी असली तरी तितक्याच वेगाने आणि तितकाच स्वादिष्ट हा चिवडा असतो.
मुरमुरे, पोहे, शेंगदाणे, फुटाणे, कांदा आणि त्याला सोबत म्हणून आंब्याचे लोणचेही असते. ग्राहकांच्या स्वादानुसार सुभद्राबाई चिवडा बनवून देतात. यवतमाळातून विदेशात गेलेली मंडळीदेखील आजीबाईचा कच्चा चिवडा खाल्ल्याशिवाय परत जात नाहीत. दोन दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील यवतमाळकरांनी विदेशात हा चिवडा पार्सल करून नेला.
‘यवतमाळची चाैपाटी’, आझाद मैदान परिसर या ठिकाणी चिवड्याची अनेक दुकाने असून पक्का तसेच कच्चा दोन्ही प्रकारचा चिवडा येथे मिळतो. त्यातल्या त्यात कच्चा चिवडा हा येथील खास खाद्यप्रकार आहे. येथे दिवसभर चिवडाप्रेमींची गर्दी असते. मग तुम्ही कधी जाताय या खास चिवड्याची चव चाखायला..