यवतमाळ : शहरातील गुन्हेगारी आता प्रचंड टोकाला पोहोचली आहे. सतत कारवाई करतो, गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून तत्काळ अटक केली जाते, असे नेटवर्क असणाऱ्या पोलिस शिपायालाच संपविण्याची भाषा गुन्हेगार करू लागले आहे. सोमवारी रात्री शहर ठाण्यातील पोलिस शिपायाच्या खबऱ्याला उचलून गुन्हेगारांच्या टोळीने बेदम मारहाण केली. त्याला बंदुकीचा धाक दाखवित खबर पोहोचविणाऱ्या शिपायाचा अतापता विचारण्यात आला. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ निर्माण झाली. स्वत: पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड रात्री बाहेर पडले.
शहर पोलिस ठाण्याचा कारभार केवळ एका शिपायाच्या माहितीवर सुरू आहे. डायल ११२ साठी काम करणाऱ्या या शिपायाने अल्पावधीतच आपले नेटवर्क उभे केले आहे. शहर ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या हालचालींवर त्याचे बारीक लक्ष असते. विशेष करून पाटीपुरा, गौतमनगर, वंजारी फैल या भागातील गुन्हेगारांची माहिती त्याला मिळत असते. यासाठी त्याने काही खबऱ्यांना सक्रिय केले आहे. यामुळेच संतापलेल्या गुन्हेगाराच्या टोळीने थेट पोलिस शिपायाला संपविण्याचा घाट घातला.
पोलिस शिपायाचे नेटवर्क कमजोर करण्यासाठी त्याच्या जवळचा खबरी असलेल्या सूरज नामक युवकाला वंजारी फैलातून ताब्यात घेतले. सुरुवातीला गोडीगुलाबीने बोलत सूरजला सार्वजनिक शौचालयाजवळ आणले. तेथे त्याला थापडबुक्क्यांनी जवळपास अर्धा तास मारहाण केली. दहा जणांपैकी पाच जणांजवळ देशी कट्टा होता. त्या पाचही जणांनी कट्टा रोखून ‘तू ज्या पोलिस शिपायाला खबर देतो, त्याचा नाव पत्ता सांग. नाहीतर तुला संपवितो,’ असे म्हणत धमकावले.
कशीबशी माहिती देऊन सूरजने त्या दहा जणांच्या तावडीतून सुटका करून घेतली. तो थेट दारव्हा मार्गावर पोहोचला. या धक्क्यातून सावरत सूरज शहर पोलिस ठाण्यात पोहोचला. सूरजची येथील अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्याच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला. धमकावणाऱ्यांपैकी कुणालाही नावानिशी ओळखत नसल्याचे सूरजने सांगितले. शहर ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी मध्यरात्रीपर्यंत आरोपींचा शोध घेतला. मात्र, काही हाती लागले नाही. या प्रकरणी धमकाविल्याचा गुन्हा अज्ञातांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
हा एकूण घटनाक्रम जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांंना माहीत होताच ते स्वत: त्या शिपायाच्या घरी गेले. तेथे त्याला धीर देत शस्त्र देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्या शिपायाकडून शस्त्र मिळविण्यासाठी अर्जही मागविण्यात आला आहे. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या एकूणच घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते. धमकावणारे आरोपी नेमके कोण, खबऱ्या सांगतोय, त्यात कितपत तथ्य आहे, याचाही शोध पोलिस घेत आहेत. घटना खरी असेल तर गुन्हेगारांचे मनसुबे किती धोकादायक आहेत, याचा अंदाज येतो. वेळीच शहरातील गुन्हेगारी मोडीत काढली नाही, तर उद्या पोलिसांनाही संघर्ष करावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.