विलास गावंडे
यवतमाळ : वनविभागाची जंगल सुरक्षेच्यादृष्टीने होणारी चालढकल, काही लोकांचा बेजबाबदारपणा यामुळे दोन वर्षांत १३ हजार ८४६ वेळा आगीच्या घटना घडल्या. जंगल पेटल्याने एक कोटी रुपयांपेक्षा अधिक वनसंपदेची राखरांगोळी झाली. ११ वनवृत्त आणि तीन वन्यजीव क्षेत्रात हे प्रकार घडले आहे. सर्वाधिक ४६८९ वेळा गडचिरोली वनवृत्तामध्ये जंगलाला आग लागली आहे.
वनातील गवत न काढणे, फायर लाईन काढण्याकडे दुर्लक्ष, यासोबतच लागलेला वनवा आगीच्या घटनांसाठी कारणीभूत ठरला आहे. जंगलालगतच्या शेतात पेटविलेला काडीकचरा, वनक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी पेटविलेल्या काड्यांनीही जंगल खाक झाले आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडत असतानाही प्रभावी उपाययोजना वनविभागाकडून होताना दिसत नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आगीच्या घटनांसंदर्भात माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली आहे. यातून आगीच्या घटनांचे वास्तव पुढे आले आहे. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ वनवृत्ताशिवाय औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, नाशिक, पुणे, ठाणे, तसेच नागपूर, नाशिक आणि मुंबई वन्यजीव क्षेत्राला या आगीची झळ पोहोचली आहे. विदर्भातील गडचिरोलीनंतर आधीच्या सर्वाधिक घटनांत ठाणे वनवृत्तात १७९३ इतक्या घडल्या आहेत.
२०१९ या वर्षात सात हजार ६१८ घटना घडल्या असून ६६ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. २०२० मध्ये ६२२८ घटनांमुळे वनविभागाला ४२ लाख १८ हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसानीची झळ पोहोचली आहे.