अविनाश साबापुरे
यवतमाळ : दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. परंतु, आता पुस्तकांसोबतच विद्यार्थ्यांना चक्क टॅबवरही अभ्यास करता येणार आहे. त्यासाठी दीड हजार शाळांना अद्ययावत टॅबलेट व सोबत सॉफ्टवेअरचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या टॅबच्या आधारे ग्रामीण भागातील शाळांमध्येडिजिटल लायब्ररी उभारली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासकीय शाळांमध्ये आधुनिक पद्धतीने अध्ययन-अध्यापन व्हावे, यासाठी डिजिटल लायब्ररीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पुस्तकांसोबतच टॅब पुरवून विद्यार्थ्यांना भरपूर अवांतर वाचन करण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. राज्याचा शैक्षणिक स्तर तसेच परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडेक्स वाढविण्यासाठी राज्यात गेल्या पाच वर्षांपासून ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अभियानही सुरू करण्यात आले आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून २०२२-२३ या आर्थिक वर्षात जागतिक बॅंकेच्या सहकार्याने राज्यात ‘स्टार्स प्रकल्प’ सुरू करण्यात आला. त्यासाठी २५ कोटी ६२ लाखांची तरतूदही करण्यात आली आहे.
याच निधीतून आता १,५२५ शाळांना टॅबचे वाटप केले जाणार आहे. इंडस एज्युट्रेन कंपनीद्वारे हे टॅब शाळांपर्यंत पोहोचविले जात आहेत. टॅब प्राप्त करून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी जिल्हा परिषद आणि नगरपालिकांना सूचना दिल्या आहेत. सोबतच डिजिटल लायब्ररीसाठी आयसीटी लॅबप्रमाणे वर्गखोली, वीज पुरवठा, फर्निचर आणि इंटरनेट नेटवर्क उपलब्ध करण्याचेही निर्देश दिले आहेत.
टॅबलेटसाठी पटसंख्येचा निकष
महाराष्ट्रातील एकंदर १,५२५ शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी उभारली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला टॅब, सॉफ्टवेअर मिळणार आहे. परंतु, यातील १००पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या १,२५५ शाळांना केवळ दहा टॅबलेट मिळतील तर १००पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या २७० शाळांना २० टॅबलेट दिले जाणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती लायब्ररी होणार
यवतमाळ - ४९, वाशिम - ५३, वर्धा - २३, अकाेला - ४८, अमरावती - ५८, भंडारा - ४३, बुलढाणा - ५१, चंद्रपूर - ५९, गडचिरोली - ४९, गोंदिया - ५१, नागपूर - ५०, रायगड - ३१, रत्नागिरी - २७, सांगली - ३९, सातारा - ३५, सिंधुदुर्ग - ४०, सोलापूर - ५०, ठाणे - ४५, अहमदनगर - ४०, औरंगाबाद - ५०, बीड - ४४, धुळे - ८, हिंगोली - ५१, जळगाव - ५०, जालना - ५१, कोल्हापूर - ४८, लातूर - ५०, नांदेड - ५१, नंदुरबार - ४०, नाशिक - ४३, उस्मानाबाद - ५२, पालघर - ४८, परभणी - ५०, पुणे - ३७.