यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ नोंदविली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा बुधवार २० मार्चपासून सकाळ पाळीत भरविल्या जाणार आहेत. यामध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे.
याबाबत शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी मंगळवारी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश बजावले आहेत. हा आदेश सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहणार आहे. बुधवारपासून सकाळी ७ ते दुपारी १२ वाजतापर्यंत शाळा भरविण्याचे आदेश आहेत. या कालावधीत ३० मिनिटांची एक या प्रमाणे एकंदर आठ तासिका घ्याव्या लागणार आहेत. तर उर्वरित एक तासात १० मिनिटांची लघु विश्रांती तसेच ५० मिनिटांची दीर्घ विश्रांती या प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
मागील आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानाचा पारा ३१ ते ३५ अंशांपर्यंत गेलेला आहे. सकाळी ११ वाजतापासूनच सूर्य कोपू लागलेला आहे. यामुळे ग्रामीण भागासह शहरातील चिमुकल्यांनाही प्रचंड काहिली सहन करावी लागत आहे. दुपारच्या सत्रात ११ ते ५ वाजतापर्यंत वर्गात बसून राहताना विद्यार्थ्यांच्या शरीराला अक्षरश: घामाच्या धारा लागत असल्याचे शिक्षक सांगत आहेत. हा त्रास लक्षात घेऊन शिक्षण विभागाने प्राथमिक आणि उच्च प्राथमिकच्या शाळा सकाळ पाळीत भरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा म्हणाले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र दुपारी १२ वाजता शाळेतून घरी जाताना त्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच सकाळ पाळीतील शाळेचा निर्णय मागील आठवड्यातच घ्यायला हवा होता, असेही शिक्षक वर्तृतळातून बोलले जात आहे.