लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एक मुलगा, एक मुलगी, याचा भाजीचा व्यवसाय, ती सौदर्य प्रसाधनाच्या दुकानात नोकर असा सुखी संसार सुरू असतानाच त्याच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. गुरुवारी पहाटे त्याने स्वत:च्या पत्नीचाच झोपेत गळा आवळून खून केला. पत्नी ठार झाल्याची खात्री केल्यानंतर तो थेट यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. ही थरारक घटना माळीपुरा परिसरात घडली. उर्मिला श्रीकांत श्रीरामे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा खून श्रीकांत उर्फ नागो तुकाराम श्रीरामे (३८) यानेच गळा आवळून केला. उर्मिला व श्रीकांतला पाच वर्षाची तनश्री व तीन वर्षाचा वंश अशी दोन मुले आहे. त्यांची दोन्ही मुले आत्याकडे नागपूर येथे शिकायला आहे. घरी उर्मिला व श्रीकांत हे दोघे व श्रीकांतचे वडील तुकाराम राहत होते. घरात कष्टाने आलेल्या पैशांतून आलबेल होते. मात्र का कुणास ठाकून श्रीकांत उर्मिलावर संशय घेऊ लागला. उर्मिलाचे माहेर बाभूळगाव तालुक्यातील. ती पतीसह २० मे रोजी लग्नाला जाऊन आली. तेव्हापासूनच श्रीकांतचा जाच वाढला. श्रीकांतने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केला. नंतर ती मृत झाली की नाही याची खात्री करण्यासाठी उशीने तोंड दाबले, त्यानंतर घरातच शेळ्या बांधण्यासाठी ठेवलेल्या दोराने तिचा गळा आवळला. पत्नी मरण पावल्याची पूर्ण खात्री झाल्यावर श्रीकांत स्वत:हूनच शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून खात्री केली व श्रीकांतला ताब्यात घेतले. या प्रकरणी उर्मिलाचा भाऊ होमराज नारनवरे रा. बाभूळगाव याच्या तक्रारीवरून श्रीकांतविरुद्ध कलम ३०२ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
कौटुंबिक वादातून दुसरा खून - माळीपुरा परिसरात एकाच महिन्यात कौटुंबिक वादातून खुनाच्या दोन घटना झाल्या आहे. यापूर्वी मद्यपी मोठ्या भावाने स्वत:च्या आईवर हात उगारला हे पाहून लहान भावाला संताप अनावर झाला. त्याने चाकूने भोसकून भावाचा खून केला. त्या पाठोपाठ नवभारत चौकात संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळला, अशा दोन घटना येथे झाल्या आहेत.