यवतमाळ : प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या पत्नीच्या निरोप समारंभातच सेवानिवृत्त कृषी अधिकारी पतीने जगाचाच निरोप घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येथील डायटमध्ये घडली.
विकास महाजन (वय ६६, रा. शिवनेरी सोसायटी आर्णी नाका) असे मृत पतीचे नाव आहे. त्यांची पत्नी प्रा. डॉ. रेखा महाजन गेल्या अनेक वर्षांपासून येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डायट) प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. विशेष म्हणजे त्यांचे शिक्षण डायटमध्येच झाले. तेथेच त्यांनी प्राध्यापकापासून सेवा सुरू केली. तेथूनच त्या ३१ मार्चला सेवानिवृत्त झाल्या. त्यांना निरोप देण्यासाठी कार्यालयीन सहकाऱ्यांनी गुरुवारी ‘स्वल्पविराम’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला प्रा. डॉ. रेखा महाजन यांच्यासह त्यांचे पती विकास महाजन, डॉ. सोनम व अभियंता शलाका या दोन मुली, अभियंता मुलगा आनंद उपस्थित होते. कार्यक्रमात विकास महाजन व डॉ. रेखा महाजन यांच्या हस्ते जिल्ह्यातील पीएच.डी. प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विकास महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर मंचावर आपले स्थान ग्रहण केले. याच वेळी अचानक त्यांना भोवळ आली. ते खाली कोसळले.
या कार्यक्रमाला उपस्थित विकास महाजन यांची मोठी मुलगी डॉ. सोनम कुटे यांनी त्यांची तपासणी केली. त्याच वेळी डॉ. सोनम यांची धाकधूक वाढली. संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. तातडीने विकास महाजन यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पत्नीच्या निरोप समारंभातच पतीने जगाचा निरोप घेतल्याची ही आगळीवेगळी घटना ठरली. विकास महाजन यांच्या दोन्ही मुलींचे विवाह झाले आहे. कार्यक्रमाला त्यांची मुलेही उपस्थित होती. संपूर्ण कुटुंबादेखतच विकास महाजन यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यामुळे डायटमधील स्वल्पविराम हा कार्यक्रम विकास महाजन यांच्यासाठी पूर्णविराम ठरला.