वणी (यवतमाळ) : वणीकडून घुग्घुसकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या बोलेरो वाहनाला जबर धडक दिली. त्यामुळे हे बोलेरो वाहन रस्त्यावर काम करत असलेल्या मजुरांच्या अंगावर गेले. या विचित्र अपघातात दोन मजूर ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास वणी-घुग्घुस मार्गावरील पुनवट येथील बसथांब्यासमोर घडली.
राजू देवराव मिलमिले (२७) रा. कोठोडा (ता. केळापूर), महादेव धर्माजी भटवलकर (६५) रा. बेलोरा (ता. वणी) अशी मृतांची नावे आहेत, तर सुरेश पांडुरंग जुनगरी (५०), सतीश प्रभाकर गेडाम (३४) दोघेही रा. बेलोरा व पांडुरंग सुधाकर अवताडे (३०) रा. कोठोडा (ता. केळापूर) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी सुरेश व सतीश या दोघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
वणी-घुग्घुस या मार्गावरील सिमेंट रोडवर डागडुजीचे काम सुरू आहे. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास काही मजूर या रस्त्यावर काम करीत होते. याच वेळी वणीवरून एक ट्रक घुग्घुसकडे भरधाव जात होता. पुनवट बसथांब्याजवळ ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक रस्त्यावर उभ्या असलेल्या बोलेरो वाहनावर जाऊन जोरदार धडकला. यावेळी बोलेरोमध्येही काही मजूर बसून होते. जोरदार धडक बसल्याने बोलेरो वाहन रस्त्यावर काम करीत असलेल्या मजुरांच्या अंगावर गेले आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. अपघात घडताच, ट्रकचालक वाहनासह तेथून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच, शिरपूर पोलीसही घटनास्थळी पोहोचले.