यवतमाळ : करळगाव घाटात सोमवारी पहाटे ४ वाजता साखरचा ट्रक लुटण्यात आला. या गुन्ह्याचा मास्टर माइंड नागपुरातील असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या लुटीचा कट यवतमाळातील गौतमनगरमध्ये एकाच्या घरी शिजला. त्यानंतर धामणगाववरून येणारा साखरचा ट्रक लुटण्यात आला. पोलिसांनी दहा तासात गुन्ह्याचा छडा लावला. यात तिघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
शशिकांत उर्फ जॅकी सोनडवले रा. पाटीपुरा, विक्की सारवे रा. गौतमनगर, लतिफ शेख रा. इंदिरानगर या तिघांना अटक केली. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार रोहित, साहील, शाहरुख व इतर एक हे तिघे पसार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची कार ताब्यात घ्यायची आहे. याच आधारावर तपास अधिकारी सहायक निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी न्यायालयात आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पाच दिवसांचा पीसीआर दिला आहे. पोलिस आता पसार आराेपींचा शोध घेत आहे. एकूणच गुन्ह्याचा घटनाक्रम पोलिसांपुढे स्पष्ट झाला आहे.
चंद्रपुरात आले एकत्र
गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार राेहित व यवतमाळच्या गौतमनगरातील साहील यांची ओळख झाली. तेथून हे दोघेही संपर्कात होते. लुटमारीची घटना करण्यापूर्वी सात दिवस अगोदर राेहित यवतमाळात मुक्कामी होता. याचदरम्यान साहीलच्या माध्यमातून इतर चार जणांशी त्याची ओळख झाली. रोहितच्या सांगण्यानुसारच धामणगाववरून येणारा ट्रक लुटण्याचे निश्चित झाले. सोमवारी पहाटे चार वाजता करळगाव घाटातील बिडकर फार्मसमोर साखरचा ट्रक या टोळीच्या हाती लागला.
अशी केली लूटमार
करळगाव घाटातील नागमोडी वळण आणि उंच चढाई असल्याने माल घेऊन येणाऱ्या वाहनांचा वेग आपोआपच कमी होतो. हीच बाब दरोडा टाकणाऱ्या आरोपींनी हेरली. बिडकर फार्मजवळ नागमोडी वळण आहे. त्या ठिकाणी कुठल्याही वाहनाला वेग कमी करावा लागतो. त्यात २५ टन साखर असलेला ट्रक चालत जाऊन अडविता येतो. हे हेरूनच दरोडेखोरांनी त्यांची कार ट्रकला आडवी लावली. चाकूचा धाक दाखवित चालक व वाहकाला खाली ओढले. या झटापटीत चालक पळून गेला. त्यानंतर शाहरुखने ट्रकचा ताबा घेऊन इतर दोन साथीदारांना सोबत घेत वणी मार्गाने पलायन केले. त्यांच्या पुढे कार घेऊन रोहितसह दोघेजण रस्ता चेक करीत जात होते.
वरोरा येथेच साखर विक्रीचा डाव
वरोरा एमआयडीसी परिसरात ट्रक अचानक बंद पडला. एलसीबीच्या पथकाने जुन्या मालकाकडून जीपीएस नेव्हिगेशन की ॲक्टिव करून इंजिन लॉक केले. यामुळे दरोडेखोरांना वेळेवर प्लॅन चेंज करावा लागला. रोहितसह दोघे जण साखरचा माल विकण्यासाठी वरोरा परिसरात ग्राहक शोधण्यासाठी निघून गेले, तर संशय येऊ नये म्हणून जॅकी, विक्की व लतिफ हे तिघे यवतमाळला परत आले. ते घरी पोहोचताच शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, तर दुसरीकडे एलसीबी पथकाने वरोरा एमआयडीसीतील ट्रक जप्त केला.