लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. महिलांना देण्यात येणारे हे मानधन बँकेने कर्जाच्या वसुलीत जमा करण्याचा सपाटा लावला आहे. केवायसी, तसेच इतर नियम समोर करून महिलांना योजनेपासून वंचित केले जात आहे. यासंदर्भात अनेक महिलांनी शिवसेनेचे नेते शैलेश ठाकूर यांच्यासोबत बैठक घेऊन सरकारचा निषेध केला. शैलेश ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्थसहाय्य त्वरीत मिळायला पाहिजे, असे शासकीय बंधन आहे. असे असताना काही महिला भगिनींच्या बैंक खात्यावर त्यांनी बचत गटाकडून घेतलेली कर्जाऊ रक्कम भरणा न केल्यामुळे लाडक्या बहीण योजनेच्या अर्थसहाय्यातून इंडूसन बैंक शाखा घाटंजीत नियमबाह्यरीत्या कापून घेत आहे. यामुळे पैसे जमा होऊनही संबंधित महिला भगिनी या अर्थसहाय्यापासून वंचित राहत आहे.
अशी रक्कम कापून घेऊ नये, असे मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश असतानाही रक्कम कापली जात आहे. ही बाब निषेधार्थ आहे. संबंधित बँकांना योग्य ती सूचना देऊन कार्यवाही करावी. लाभ मिळण्यास विलंब झाल्यास घाटंजी शहरातील संबंधित बँकेविरुद्ध लाडक्या बहिणी ३० सप्टेंबरला धरणे आंदोलन करणार आहे, असा इशारा शैलेश ठाकूर यांनी दिला आहे.
योजनेतील लाभार्थी महिलांना खाते उघडण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी सोडवाव्या लागल्या. आता खात्यात पैसा आल्यानंतरही त्यांच्याकडे अडचणी कायमच आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांकडे योजनेचा पैसा वळता झाल्यानंतरही त्यांना शासन दरबारी येरझारा माराव्या लागत आहे. यातून महिला अडचणीत आल्या आहेत. यानंतरही कुठल्याही उपाययोजना होत नाही.
महिलांनी बँकेकडून कागदपत्रे जमा केल्यानंतर गत एक महिन्यापासून बँकेने बऱ्याच केवायसी प्रलंबित ठेवल्या आहेत. याविरोधात आवाज उठवित घाटंजीचे माजी नगरसेवक सैयद फिरोज, माजी नगर सेवक विक्रम ठाकूर, संदीप डिकुंडवार, रोशन मुद्दलवार, सय्यद मुजीब यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
रस्त्यावर उतरून आंदोलन करू
- दोन महिन्यांवर आलेली विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. बँका मात्र या योजनेचे तीनतेरा वाजवित आहे. सरकारी यंत्रणा सुद्धा हा विषय गंभीरतेने घेत नाही. सरकारी यंत्रणेने हा विषय गंभीरतेने न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही, असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे.
- संपूर्ण जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिला लाभार्थ्यांकडून विविध क्षेत्रात आर्थिक लूट केली जात आहे. हा प्रकार सर्वत्र होत असताना शासकीय यंत्रणा मात्र गप्प आहे.