पुसद (यवतमाळ) : नुकत्याच जन्मलेल्या बाळाला नालीत फेकून देण्यात आल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तेथील बीएसएनएल कार्यालयामागील एका कोचिंग क्लासजवळ उघडकीस आली. ही घटना अनैतिक संबंधातून घडली असल्याचा संशय व्यक्त होत असून या घटनेने शहरात खळबळ उडाली.
पुसद शहर व परिसरात रविवारी अचानक अवकाळी पाऊस झाला. या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत एका अनोळखी मातेने चक्क पोटच्या गोळ्याला जन्म होताच येथील बीएसएनएल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या कोचिंग क्लासजवळील रस्त्याच्या नालीत फेकून दिले. सदर बाळ हे पुरुष जातीचे असल्याची माहिती असून या घटनेची माहिती नागरिकांनी पुसद शहर पोलिसांना दिली. ठाणेदार उमेश बेसरकर यांनी ताफ्यासह तात्काळ घटनास्थळ गाठून एक तासापूर्वी जन्मलेल्या व चिखलात फेकलेल्या बाळाला उचलून पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉ. अविनाश जाधव, डॉ. आशिष कदम, डॉ. उमाशंकर अवस्थी आदींनी तातडीने प्राथमिक उपचार केले.
बाळाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी रवाना केले. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. उमाशंकर अवस्थी, चालक गणेश काईट, नर्स सविता कपाटे, पल्लवी ताटेवार, पोलीस शिपाई अनिल गारवे आदींनी बाळाला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुखरूप पोहोचविले. सदर घटना अनैतिक संबंधातून घडली असल्याचा संशय व्यक्त होत असून पोटच्या गोळ्याला मरण्यासाठी नालीत फेकून देणाऱ्या माता-पित्याबाबत सर्व स्तरातून निषेध व संताप व्यक्त होत आहे.
''देव तारी त्याला कोण मारी''
एक तासापूर्वी जन्मलेल्या व मारण्यासाठी नालीत फेकून दिलेल्या बाळाला तातडीने मदत मिळाली. आता ते बाळ सुखरूप असून त्याची रवानगी माता-बाल संगोपन केंद्रात करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. उमाशंकर अवस्थी यांनी दिली. सदर बाळ सुखरूप असल्याने ''देव तारी त्याला कोण मारी '' या म्हणीचा प्रत्यय आला.