दिग्रस (यवतमाळ) : कोणाच्या जाण्या-येण्याने पक्ष संपत नसतो. उभा महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आपणही आपसातील मतभेद विसरून खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा आणि आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकवा, असे आवाहन खासदार अरविंद सावंत यांनी केले. दिग्रस येथे आयोजित शिवसेनाउद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी सावंत पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले. परंतु, उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नाही. त्यांनी ज्या दिवशी राजीनामा दिला, त्याच दिवशी शासकीय बंगलासुद्धा खाली केला. त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र रडला होता. अत्यंत संयमी व शांत स्वभावाच्या नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. एवढेच नव्हे तर शिवसेना फोडण्याचे पाप त्यांनी केले.
यवतमाळ-वाशिम मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा दिग्रस येथे आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, वाशिमचे संपर्कप्रमुख दिलीप जाधव, राजूसिंग नाईक, माजी आमदार विश्वास नांदेकर, अनिल राठोड, नीलेश पेंढारकर, वाशिम जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुरेश मापारी, युवा सेनेचे विदर्भाचे सचिव सागर देशमुख, निवृत्त न्यायाधीश किशोर राठोड, जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सेवानिवृत्त न्यायाधीश प्रकाश राठोड यांनी केले. यावेळी अनिल राठोड, प्रवीण शिंदे आदींची भाषणे झाली.