महागाव (यवतमाळ) :यवतमाळ जिल्ह्यातील घोणसरा- बरगेवाडी शिवारात पन्नासहून अधिक पोलिसांनी बुधवारी पहाटे धाड टाकली होती. यावेळी सुमारे २५ एकरांत गांजाचे आंतरपीक घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. यावेळी १५ क्विंटलपेक्षा अधिक गांजा जप्त करत पोलिसांनी चार शेतकऱ्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पथकाची या परिसरात कारवाई सुरू होती. गुरुवारीही सुमारे ट्रॅक्टरभर गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, गांजा जप्तीची कारवाई सुरू असताना एक शेतकरी पसार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
महागाव तालुक्यातील घोणसरा आणि बरगेवाडी परिसरात गांजाची शेती करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे काही पोलिसांनी घटनास्थळी साध्या वेशात जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये तथ्य आढळल्याने तेही चक्रावून गेले. याबाबतची माहिती पोलिसांकडून गुप्तपणे आठवडाभरापासून घेण्यात येत होती. त्यानंतर पोलिस अधीक्षकांना याबाबतचा अहवाल देण्यात आला आणि त्यानंतर बुधवारी पहाटे सुमारे ५० पेक्षा अधिक पोलिसांनी घोणसरा-बरगेवाडी शिवारात पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंह सोनुने यांच्या उपस्थितीत धाड टाकली. यावेळी सुमारे २५ एकरांत ठरावीक अंतरावर कापूस आणि सोयाबीन पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचे दिसून आले.
चक्क २५ एकरात गांजाचे आंतरपीक, ५० पोलिसांनी घातली पहाटे धाड
नेमक्या किती एकर क्षेत्रावर ही लागवड झाली, याचा तपास गुरुवारीही सुरूच होता. शेतातील उभ्या पिकाचा शोध घेऊन उपटलेल्या झाडांची मोजदाद करणे, तसेच त्यांची कापणी करून ही सर्व झाडे एका ठिकाणी आणणे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात गांजाचे पीक आढळले, त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेणे आदी कारवाई दिवसभर सुरू होती. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून होते. दरम्यान, गुरुवारी एका शेतकऱ्याच्या शेतातून गांजाची झाडे जप्त करण्यात आली. मात्र, या कारवाईदरम्यान हा शेतकरी पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आणखी काही ठिकाणी गांजा शेतीचा संशय
घोणसरा- बरगेवाडी शिवारात बुधवारपासून पोलिस कारवाई सुरू आहे. अतिशय डोंगराळ अशा भागात सहसा कोणीही फिरकत नाही. नेमका याचाच फायदा घेऊन काही शेतकऱ्यांनी येथे गांजाची शेती सुरू केली होती. गांजाच्या शेतीचे क्षेत्र वाढत आहे. दरम्यान, मोहदी येथील एका शेतातूनही गुरुवारी मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. या परिसरात आणखी काही ठिकाणी आंतरपिकामध्ये गांजा पीक घेतले जात असल्याचा अंदाज असून, त्याचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल सांगळे यांनी सांगितले.