लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब रुग्णांना कुणीच वाली नाही. शुक्रवारी रात्री १० वाजता स्त्रीरोग विभागातील वार्ड क्र. ३ मध्ये पारधी समाजाच्या महिलेला सकाळी चक्क हाकलून दिले. अखेर रुग्णालय परिसरातच उघड्यावर सकाळी ८ वाजता या महिलेची प्रसूती झाली. तिनेच स्वत:च्या बाळाची नाळ तोडली. प्रसूतीनंतर ही महिला पतीसह गावी निघून गेली. प्रतीक्षा सचिन पवार (२२) रा.बाळेगाव झोंबाडी ता.नेर असे व्यवस्थेची प्रताडणा सहन कराव्या लागणाऱ्या महिलेचे नाव आहे. प्रतीक्षाची दुसरी प्रसूती होती. ती पतीसह शुक्रवारी रात्री १०८ रुग्णवाहिकेने मेडिकलमध्ये पोहोचली. तिला वार्ड क्र. ३ मध्ये दाखल करून घेतले. डॉक्टरांनी प्रतीक्षाला रक्त देण्याची गरज असल्याचे सांगून तिच्या पतीला खासगी ब्लड बॅंकेतून रक्त पिशवी मागविण्यास सांगितले. आर्थिक स्थिती नसतानाही सचिन पवार याने १,६०० रुपये किमतीची रक्ताची बॅग आणली. ही पिशवी घेऊन तो पहाटे ४.३० वाजता स्त्रीरोग विभागात पोहोचला. मात्र, तोपर्यंत तेथील डॉक्टर व नर्सेस यांनी प्रतीक्षाकडे ढुंकूनही पाहिले नाही. रक्ताची पिशवी दिल्यानंतरही रक्त लावले नाही. याची विचारणा केली असता, सचिन व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करीत वार्डातून हाकलल्याचा आरोप आहे. रुग्णालय परिसरात सकाळी ८.३० वाजता प्रतीक्षाने उघड्यावर गोंडस बाळाला जन्म दिला.
पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील रुग्णांचे हाल - रुग्णसेवक म्हणवून घेणारे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. प्रतीक्षा पवार हीसुद्धा नेर तालुक्यातील आहे. रुग्णालयातील गैरसुविधांकडे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही, येथे कणखर प्रशासक आणि रिक्त पदे तत्काळ भरण्याची आवश्यकता आहे, तरच गोरगरीब रुग्णांना न्याय मिळू शकतो. ही सुविधा देऊ शकत नसेल, तर संजय राठोड यांनी रुग्णसेवक हे बिरुद लावू नये, असा सूर ऐकायला मिळतो.
पतीने कथन केली आपबिती- रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रतीक्षाच्या वेदनेची कदर केली नाही. डॉक्टर येथे उपचार करणार नाहीत, याची खात्री पटल्याने नवजात बाळासह ओली बाळंतीण पत्नीला घेऊन आपल्या गावी पोहोचल्याचे सचिनने सांगितले.
या घटनेची कुठलीही माहिती, तक्रार माझ्याकडे आलेली नाही. या संदर्भात माहिती घेवून चौकशी केली जाईल. त्यानंतरच पुढील कार्यवाही करू. असा प्रकार होणे शक्य वाटत नाही. - डाॅ. मिलिंद फुलपाटीलअधिष्ठाता, शासकीय रुग्णालय