लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. मतदान केंद्रांवर कोणत्या प्रकारच्या असुविधांचा सामना करावा लागू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. मतदान केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती करण्यात येत आहे. हा निधी १५ व्या वित्त आयोगातून खर्च करण्यात येणार आहे.
लोकसभेत दोन हजार ५२७ मतदान केंद्र होती. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रात ५१ ने वाढ झाल्याने ही संख्या आता दोन हजार ५७८ वर पोहोचली आहे. ग्रामीण व शहरी भागात जिल्हा परिषदेच्या शाळा आहे. या ठिकाणी शाळा दुरुस्ती, पाणी, वीज, रॅम्पचा अभाव आहे. कुठे रॅम्प तुटले आहे. काही शाळांमध्ये शौचालय नादुरुस्त आहे. मतदानासाठी रांगा लागू नये, यासाठी केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदानासाठी आलेल्या मतदारांना कोणत्याही प्रकारच्या असुविधांचा सामना करावा लागू नये, म्हणून प्रशासनाने सुविधांवर फोकस केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली होती. शौचालय, रॅम्प वॉक दुरुस्ती, वीज, पाणी आदी किरकोळ बाबींवर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ग्रामपातळीवर गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांकडे दुरुस्तीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
निवडणुकीत शाळांतील सुविधांच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळाल्याने त्याचा फायदा शिक्षक व विद्यार्थ्यांना होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला होता विधानसभा निवडणुकीत हा टक्का अधिक वाढावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मतदार जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये, याची काळजी घेण्यात येत आहे.
अशी आहेत मतदान केंद्रे विधानसभा संख्या वणी ३४१ राळेगाव ३५० यवतमाळ ४२७ दिग्रस ३९६ आर्णी ३७४ पुसद ३४७ उमरखेड ३४७
"लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र असलेल्या शाळांची दुरुस्ती करण्यात आली होती. या निवडणुकीत शाळांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार शौचालय, रॅम्प वॉक दुरुस्ती करण्यात येत आहे." - प्रकाश मिश्रा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)