यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर केला. यात यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९३.०५ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यातील एकंदर ३१ हजार ३५७ विद्यार्थ्यांपैकी २९ हजार १७९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मागील वर्षीपेक्षा जिल्ह्याचा निकाल किंचित सुधारला आहे. मागील वर्षी ९१.९८ टक्के निकाल लागला होता.
राज्य मंडळामार्फत यंदा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील १२४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. मंगळवारी या परीक्षेचा निकाल जाहीर होताच यशस्वी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
बारावीच्या परीक्षेसाठी एकंदर ३१ हजार ५९५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३१ हजार ३५७ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी २९ हजार १७९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये १५ हजार १३५ मुले तर १४ हजार ४४ मुली यशस्वी झालेल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२६ इतकी असून ९५.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
अमरावती विभागातून यंदा यवतमाळ जिल्ह्याची कामगिरी सुधारली आहे. मागील वर्षीच्या बारावीच्या निकालात जिल्हा चौथ्या क्रमांकावर होता. तर यंदा यवतमाळ विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमरावती विभागात सर्वाधिक निकाल वाशिम जिल्ह्याचा ९५.६९ टक्के आहे. अकोला ९३.३७, यवतमाळ ९३.०५, अमरावती ९२.३३ तर बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ९१.७८ टक्के आहे. जिल्ह्याच्या निकालाचा तालुकानिहाय विचार करता नेर, महागाव, आर्णी या तालुक्यांनी यंदाही निकालात आघाडी घेतली आहे. तर वणी उपविभागातील वणीसह मारेगाव, पांढरकवडा, झरी हे तालुके यंदाही पिछाडीवर राहिले आहेत.
तालुकानिहाय निकालयवतमाळ : ९२.२७नेर : ९८.३५दारव्हा : ९२.५०दिग्रस : ९४.२०आर्णी : ९६.२७पुसद : ९३.१७उमरखेड : ९४.८८महागाव : ९७.६६बाभूळगाव : ९७.५२कळंब : ९३.१२राळेगाव : ९४.०९मारेगाव : ८७.५५पांढरकवडा : ८८.९८झरी जामणी : ८८.६०वणी : ८३.६०घाटंजी : ९२.६७