लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र, मागील काही दिवसांत पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर शुक्रवारी त्यात आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढत आहे. नागरिकांनी त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण घटल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यातच शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरू होत असतानाच पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंता वर्तविली जात आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. शुक्रवारी त्यात आणखी ११ नव्या रुग्णांची भर पडली. शुक्रवारी बाधित निघालेल्या रुग्णांमध्ये यवतमाळ येथील चार रुग्णांसह दारव्हा तालुक्यातील दोन, दिग्रस तालुक्यातील तीन, तर नेर व राळेगाव तालुक्यातील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे. या ११ रुग्णांमध्ये चार महिला असून सात पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनाचा पहिला, दुसरा व तिसरा डोस घेऊन पूर्ण लसीकरण करावे, स्वत:सह कुटुंबीयांना सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
पॉझिटिव्हिटी दर ९ वर - शुक्रवारी नव्या ११ रुग्णांची नोंद झाली. त्यापूर्वी गुरुवारी नऊ बाधित आढळले होते. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २७ एवढी झाली आहे. यातील तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. दरम्यान जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९ इतका झाला असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.५६ आहे, तर मृत्यू दर २.२८ इतका आहे.
आजवर १८०३ जणांचा मृत्यू- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी यवतमाळकरांनी विशेष दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आजवर जिल्ह्यात कोरोनामुळे तब्बल १८०३ मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेल्यानंतर गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी सर्वांनाच दक्षता बाळगावी लागणार आहे.