यवतमाळ : गोरगरिबांनी पै-पै गोळा करुन घरकुलाचे बांधकाम सुरु केले. मात्र पहिला हप्ता देऊन प्रशासनाने दुसरा हप्ता मात्र अडवून धरला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि दुसऱ्या हप्त्याच्या निधी वितरणाला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या २५ हजार लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हक्काचे घर नसलेल्या गरिबांसाठी घरकुल योजना उपयुक्त ठरते. मात्र, योजनेतून मंजुरी मिळविताना व नंतर निधी मिळविताना या गरिबांचा जीव मेटाकुटीला येतो. मोदी आवास योजनेतून पहिला हप्ता मिळवून घराचा पाया बांधणाऱ्या गरिबांना दुसरा हप्ता मिळालेला नव्हता. त्यामुळे त्यांची तगमग सुरू होती. घरकुलाचा पायवा घेऊन बसलेल्या तब्बल २५ हजार ५५४ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या पैशांची नितांत गरज होती.
मोदी आवास योजनेतून ग्रामीण क्षेत्रात घरकुलासाठी १ लाख २० हजारांची रक्कम लाभार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने दिली जाते. यात घरकुल मंजूर झाल्यावर पहिला हप्ता १५ हजारांचा मिळतो. पायवा पूर्ण झाल्यावर ४५ हजारांचा दुसरा हप्ता आणि लिंटर लेवलपर्यंत काम झाल्यावर तिसरा ४० हजारांचा हप्ता दिला जातो. संपूर्ण घरकुल पूर्ण झाल्यावर उर्वरित २० हजार रुपये दिले जातात. तर प्रधानमंत्री आवास योजनेत दुसरा हप्ता ७० हजारांचा मिळतो.
दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळतील या आशेवर अनेकांनी हातउसने कर्ज घेऊन पायवा बांधून घेतला. परंतु, प्रशासनाकडून दुसऱ्या हप्त्याचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या गरीब लाभार्थ्यांना काळजी भेडसावत होती. याबाबत १७ एप्रिल रोजी लोकमतने ‘निवडणुकीच्या रणधुमाळीत घरकुले अडली’ या मथळ्याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने हालचाल वाढविली. घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे सोडणे सुरू केले. त्यातून आतापर्यंत एक हजार २२ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता सोडण्यात आला.
दुसऱ्या हप्त्याच्या पैसे मिळालेले लाभार्थीतालुका : मंजूर घरकूल : दुसरा हप्ता आलाआर्णी : ९६३ : ८५बाभूळगाव : १७८८ : १३दारव्हा : २१८८ : ००दिग्रस : ८९६ : २३घाटंजी : १९१२ : १७कळंब : १४२४ : ००केळापूर : १७८७ : ००महागाव : ९२० : २९मारेगाव : १६७७ : ३९नेर : १६७१ : ५०पुसद : १८९१ : ००राळेगाव : २६२९ : १९५उमरखेड : ३४६६ : १२१वणी : २७१४ : ००यवतमाळ : २३०८ : २८६झरीजामणी : १७६५ : १६४