रुपेश उत्तरवार
यवतमाळ : आज प्रत्येकजण कमी वेळात अधिक पैसा मिळावा, म्हणून काम करताना दिसतो. मात्र, काही कामगार असे आहेत, जे दिवसभर मेहनत करतात. त्यानंतरही काही हाती लागेल याची शाश्वती नसते. मात्र, ते अविरत काम करीत असतात. सोनझारी नावाने प्रसिद्ध असलेला हा कामगारवर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विखुरला आहे. परंपरागत व्यवसाय करताना, त्यांना अठराविश्व दारिद्र्याचा सामना करावा लागत आहे.
भल्या पहाटेच सोनार लाइन झाडून काढणाऱ्या महिला यवतमाळमध्ये पाहायला मिळतात. स्वच्छतेचे काम करताना सोनझारी महिला ब्रश, झाडू आणि खराट्यांच्या माध्यमातून झाडून काढत सोन्याचा शोध घेतात. यासाठी सोनार लाइनमधील ओटा, दुकानासमोरील जागा या महिला नित्यनेमाने साफ करतात.
हा संपूर्ण परिसर झाडल्यानंतर त्यांच्या हातात येते, ती त्या परिसरातील माती. जमा झालेली ही माती महिलावर्ग घरी घेऊन जाते. या मातीला स्वच्छ पाण्यात धुतले जाते. त्याकरिता रबरी अथवा विशिष्ट प्रकारचे लाकडी टोपले वापरले जाते. त्यावर माती झारल्या जाते. यातून कुठेतरी कधीतरी एखादा सोन्याचा कण हाती लागतो. हे कण गोळा केल्यानंतर आठवडाभरातील कण गोळा करून ते सोनाराकडे नेले जातात. यातून जे काही पैसे हातात पडतील, त्यावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
यवतमाळची सोनार लाइन छोटी आहे. त्यावर सर्वच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार, हा प्रश्न आहे. यामुळे पुरुष वर्ग कोटेश्वर आणि इतर धार्मिक स्थळावर कामासाठी जातात. या ठिकाणी मृतदेहाच्या राखेला गाळण्याचे काम ते करतात. या ठिकाणी मृतदेहाच्या राखेतून सोने अथवा चांदीचे काही मणी अथवा कण कधी-कधी मिळतात. त्याकरिता दिवसभर मेहनत घ्यावी लागते. राख गाळण्याचे काम तासंतास चालते. पावसाळ्यात दुकानासमोर झाडून स्वच्छता करता येत नाही. यामुळे सोनझारी कामगार याच परिसरातील नाल्यावर येणारा गाळ झारीत असतात. हे काम अधिक जिकिरीचे आहे.
मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाह
सोनझारींचे शिक्षण फार कमी आहे. मात्र, मुलांचे शिक्षण करण्यावर कुटुंबाचा भर आहे. यातून जिल्हा परिषद शाळा, वसतिगृहात त्यांची मुले शिक्षण घेत आहेत. यवतमाळात मडावी परिवारातील मंडळी सोनझारीचे काम करतात. उत्पन्न कमी असल्याने हातात पडलेल्या पैशावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ही रक्कम ताेकडी असल्याने, ते आजही कमी जागेत आणि मातीच्या घरात वास्तव्याला आहेत.
महिना-महिना राहत होतो नदीवर
सोनझारी म्हणून काम करताना, पूर्वी कुटुंबातील लोक महिना-महिना नदीवर राहत होते. तिथेच राख गाळत होते. मात्र, त्यांना कुठलीही भीती वाटत नव्हती. आमचे ते कामच आहे. आता कामावर जाणारी मंडळी घरी परत येते. हा बदल अलीकडे झाला आहे. सर्व कुटुंबाने काम केल्यानंतरही हातात किती पैसे येतील, याची शाश्वती नाही.
- राधा मडावी.
प्रत्येकाच्या हाताला काम हवे
आम्ही प्रत्येक जण काम करायला तयार आहोत, पण प्रत्येकालाच काम मिळेल याची शाश्वती नाही. सरकारने आमच्या कामाची दखल घेऊन काही मदत करावी, तरच कुटुंबाला हातभार लागेल.
- रुख्मिनी मडावी.
आठ दिवसांत एकदाच पेटते भट्टी
दररोज माती झारण्याचेे काम झाले, तरी दररोजच्या मातीतून सोने निघेल, याची शाश्वती नाही. यामुळे आठवड्याचा कचरा एकदाच झारून, नंतर भट्टी लावली जाते. ते विकून हाती पैसे पडतात. यावरच उदरनिर्वाह चालतो.
- रवी मडावी.
सासरी आणि माहेरी सारखीच जबाबदारी
माझ्या माहेरी सर्व जण सोनझारनीचेच काम करीत होते. सासरी आल्यानंतरही हेच काम करीत आहे. कामावरून आल्यावर आंघोळपाणी केेल्यावरच घरात जातो. दररोज रस्ते, नाल्या, राख गाळताना विशेष काळजी घेतली जाते. आमचा संपूर्ण परिवार याच व्यवसायात आहे.
- मीना मडावी.