लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आरोग्य सेवेचा डोलारा सांभाळत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप कायम सेवा मिळालेली नाही. सेवेत स्थायिक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ५४ दिवस संप केला होता, मात्र तरीही शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. संप काळातील पगार बुडाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यातच, तुटपुंज्या मानधनावर काम करण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे.
सन २००५ पासून महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू करण्यात आले. यामध्ये विविध ७१ संवर्गातील कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर पदभरती करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १२ ते १३ हजार कर्मचारी घेण्यात आले. १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या या अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा शासन निर्णय १४ मार्च २०२४ रोजी घेण्यात आला. यावरून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही अंमलबजावणी झालेली नाही. दहा वर्षापेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या सात हजार इतकी आहे.
चालक, परिचारिकांना केले नियमितराष्ट्रीय आरोग्य अभियानातील ७१ संवर्गापैकी चालक आणि परिचारिका या दोन संवर्गातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्यात आली.शिवाय इतर प्रवर्गातील सेवाज्येष्ठता याद्याही करण्यात आल्या. मात्र, त्यांची सेवा नियमित करण्यात आलेली नाही.
डॉक्टरांच्या तर याद्याही नाहीत
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तर सेवाज्येष्ठता याद्याही तयार करण्यात आलेल्या नाहीत. केवळ दरमहा ४० हजार रुपये मानधनावर त्यांना आरोग्य सेवा द्यावी लागत आहे.
- इतर कुठलेही लाभ त्यांना दिले जात नाही. सुट्याही केवळ १५ मंजूर होतात. १६ वी सुटी बिनपगारी घ्यावी लागते. नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जवळपास सव्वा लाख रुपये मानधन मिळत आहे.
कोविड योद्धा म्हणून गौरवराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोविड काळात चांगली सेवा दिली. याबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. कोविड योद्धा म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले. परंतु त्यांची सेवा नियमित करण्याकडे शासन निर्णय होऊनही दुर्लक्ष केले जात आहे.
२०७ जणांची पदोन्नती थांबलीराष्ट्रीय आरोग्य अभियानातील २०७ नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदोन्नती मागील तीन वर्षांपासून थांबलेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास सध्या 'गट ब'मध्ये सेवारत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळणार आहे. पदोन्नतीची फाईल पुढे सरकली तरच हे शक्य आहे.