लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढत्या महागाईमुळे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दरवर्षी १० टक्के वाढविले जाते. यावर्षी शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड होण्याचे प्रमाण घटले आहे. परिणामी बँकांचा एनपीए वाढला आहे. यामुळे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जैसे थे ठेवण्याचा निर्णय बँकर्स कमेटीच्या बैठकीत झाला. यावर्षी जिल्ह्यातील बँका २४०० कोटीचे कर्ज वितरित करणार आहे.
यावर्षी सर्वाधिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला देण्यात आले आहे. जिल्हा बँकेला ७५५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. राष्ट्रीयकृत बँका आणि व्यापारी बँकांना १४६३ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर जिल्हा ग्रामीण बँकेला ३५३ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावर्षी कर्ज वितरित करण्यापूर्वी थकबाकीदार शेतकऱ्यांकडून वसुली होणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडे शेतकऱ्यांकडून परतफेडीसाठी पुढाकार घेतला जात नसल्याची ओरड आहे. याचे प्रतिबिंब मंगळवारच्या बैठकीत पाहायला मिळाले.
बँकांनी नोंदविली चिंताबँकर्स कमेटीच्या बैठकीत शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्ज देण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल होत नाही याची चिंता बँकांनी नोंदविली. जे शेतकरी कर्जाचा भरणार करतील, असे शेतकरी नव्याने कर्ज वितरणासाठी पात्र ठरणार आहेत. वसुलीचे प्रमाण घटल्याने बँकांचा एनपीए वाढला आहे. याचीच चिंता जिल्हा प्रशासनापुढे बँकर्स कमिटीने व्यक्त केली.
यंदा हेक्टरी कर्ज वाढणारयेणाऱ्या खरीप हंगामात कापसाला ६० ते ८५ हजार रुपये हेक्टरपर्यंत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोयाबीनला ५८ ते ७५ हजार रुपये हेक्टरी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तूर लागवडीसाठी ४७ हजार ते ६५ हजार रुपये हेक्टरी कर्ज लागवडीसाठी बँका कर्ज देणार आहेत. वाढत्या महागाईने यावर्षी हेक्टरी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे.