नेर (यवतमाळ): घराचे मागील दार तोडून चोरट्यांनी २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मध्यरात्री येथील साईनगरात घडली. शिक्षक स्वप्निल शालिक वानखडे यांच्या घरी ही चोरी झाली.
घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना रात्री दार तोडून चोरटे घरात शिरले. कपाटाचे कुलूप फोडून त्यांनी प्रत्येकी २० ग्रॅम वजनाचे दोन पोहेहार, १२ व ५ ग्रॅमची सोन्याची पोत, प्रत्येकी १० ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, पाच ग्रॅमचे कानातील दागिने, १५ ग्रॅमचा गोफ, पाच व तीन ग्रॅमची अंगठी लंपास केली. जुन्या दरानुसार या वस्तूंची किंमत २ लाख ४६ हजार आहे. दागिने व रोख १५ हजार, असा एकूण २ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
चोरट्यांनी दागिन्यांचे डबे बाहेर आणून फोडले. रात्री ३ वाजेच्या सुमारास स्वप्निल वानखडे हे बाहेर आले असता चोरीचा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच नेर पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वानाने चोरट्यांचा माग केवळ भिंतीपर्यंत दाखवला.
नेर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. महिनाभरापूर्वी भर दिवसा चोरीच्या सहा घटना घडल्या होत्या. यात सुमारे १३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. यातील एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. साईनगरातील चोरीचा तपास ठाोदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर खंदार, जमादार गजानन पत्रे करीत आहेत.