यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे. उन्हाचा पारा ४४ अंशांपर्यंत वर चढला आहे. याचा परिणाम शेतशिवारात जाणवत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी घरामध्ये दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवून ठेवलेल्या कापसावरही त्याचे परिणाम होत आहेत. टिनच्या शेडमधील गंजीला आग लागण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. कापूसही पेटण्याचा धोका असून जिनिंग प्रेसिंग युनिटमध्ये या स्थितीवर मात करण्यासाठी फायरबॉल लावले जात आहेत.
शेतकऱ्यांनी कापसामध्ये दरवाढ होण्याच्या प्रतीक्षेत कापूस राखून ठेवला आहे. मात्र, हा कापूस पत्र्याच्या शेडमध्ये साठवला आहे. उन्हात पत्रे तापतात. तापलेल्या पत्र्याला कापसाचा स्पर्श झाल्यास कापूस पेट घेण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. याच प्रकाराने सध्या घराघरातील कापूस असुरक्षित झाला आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
असाच फटका जिनिंग प्रेसिंगला बसण्याचा धोका आहे. यामुळे जिनिंग प्रेसिंगचे संचालक हा कापूस तत्काळ शेडमध्ये हलवत आहेत. शिवाय या भागाला कव्हर करण्यासाठी फायरबॉल लावले जात आहेत. यामुळे आग लागल्यास हे फायरबॅाल विरघळतील आणि या ठिकाणची आग नियंत्रणात येईल. हा प्रयोग यवतमाळच्या औद्योगिक वसाहतीत केला जात आहे.
अखेर १० हजार रुपयांचा दर मिळालाच नाही -शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कापूस अजून विकला नाही. आज ना उद्या दर वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात दर वाढले नाहीत. उलट दरामध्ये घसरण झाली. सध्या कापसाला ७,४०० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला १० ते १२ हजार रुपये क्विंटलपर्यंतचा दर मे मध्ये मिळाला होता. यावर्षी हाच दर मे महिन्यात राहील, असा अंदाज आहे. यातूनच शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला आहे.