अविनाश साबापुरे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्याचे आदेश बोर्डाने दिले आहे. त्यामुळे तब्बल दीड लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण केवळ महिनाभरात आटोपण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासह आरोग्य विभागापुढे उभे राहिले आहे. दहावीची परीक्षा १५ मार्चपासून तर बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. शिवाय २५ फेब्रुवारी आणि १४ फेब्रुवारीपासून या दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेतल्या जाणार आहे. मात्र, परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण आटोपण्याचे निर्देश आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडे महिनाभरापेक्षाही कमी कालावधी उरलेला आहे. जिल्ह्यात जानेवारी अखेरपर्यंत एक लाख ४७ हजार ७०१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ५९ हजार १८६ विद्यार्थ्यांना लसीचा पहिला डोस दिला गेला. परीक्षेपूर्वी या विद्यार्थ्यांना लसीचा दुसरा डोसही मिळण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित ८८ हजार ५१५ विद्यार्थ्यांना अजून पहिलाही डोस मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे दोन्ही डोस परीक्षेपूर्वी कसे पूर्ण होतील हा प्रश्न आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण परीक्षेपूर्वी न झाल्यास त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार की नाही हा संभ्रम आहे. मात्र बोर्डाने याची मुभा दिली आहे.
शाळेतच राहणार दहावी-बारावीचे परीक्षा केंद्र- कोविडच्या परिस्थितीमुळे यंदा विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र किंवा उपकेंद्र दिले जाणार आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांपासून शाळेशी संपर्क कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झाला आहे. त्यामुळे परीक्षेत लिहिण्यासाठी जादा वेळ दिला जाणार आहे. शंभर गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे तर ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ मिळणार आहे. शिवाय २५ टक्के अभ्यासक्रमही कपात करण्यात आला आहे. त्यामुळे ७५ टक्के अभ्यासक्रमावरच प्रश्नपत्रिका राहणार आहे. विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाणार असून, त्यांना एक तास आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागणार आहे.
रविवारची सुट्टी ठरतेय अडथळा
- १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच कोविड प्रतिबंधक लस दिली जात आहे. मात्र, रविवारी शाळेला सुट्टी आणि दर रविवारी आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सुट्टी यामुळे विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची गती मंदावली आहे. तर दुसरीकडे शाळांनी लसीकरण शिबिर एखाद्या ‘इव्हेंट’सारखे साजरे करणे सुरू केले आहे. हाच उत्साह शिक्षण आणि आरोग्य विभागानेही रविवारी कायम ठेवल्यास लसीकरण वेगाने होऊ शकते. तसेच नववी व अकरावीच्या ऐवजी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.