लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सोशल मीडियावर येणारे व्हिडीओ लोकांना खिळवून ठेवतात. लोकांच्या रूचीनुसार कंटेट क्रिएट केले जातात. त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला जातो. अगदी कमी वेळाची 'रिल्स' असल्याने नागरिक मोठ्या आवडीने ते बघतात आणि लाइक्सदेखील करतात. विलास झट्टे या इन्फ्लूएन्सरचा आता सोशल मीडियावर बोलबाला आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे.
मारेगाव येथील विलास झट्टे हे कंटेट क्रिएटर्स इन्फ्लूएन्सर (प्रभावक) असून, त्याचा स्वतःचा बुट हाउसचा व्यवसाय आहे. बालपण तालुक्यातील पाथरी गावात गेले. त्याचे 'साधा माणूस' हे कॅरेक्टर लोकांना खिळवून ठेवणारे आहे. लहान-लहान विनोदातून समाजप्रबोधन करण्यात येते. लोकांना नेमके काय आवडते, हे माहीत नसल्याने व्ह्यूज मिळाले नाही. मात्र, चार महिन्यापूर्वी 'साधा माणूस' नावाचे कॅरेक्टर केले आणि लोकांची त्याला पसंती मिळाली. मग हेच कॅरेक्टर पुढे नियमित केले. या अल्पकालावधीत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ४० हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.
यश बघायला 'बाबा' नाहीत विलास याने सुरुवातीला बनविलेल्या व्हिडीओ व रिल्सला प्रसिद्धी मिळाली नाही. तरी त्याने अभिनयाचा छंद सोडला नाही. वडिलांना अभिनयाची आवड असल्याने ते कायम विलासला प्रोत्साहन द्यायचे. तीन एप्रिल रोजी वडिलांचे निधन झाले आणि विलासचा आधारवड कोसळला. माणसाचे जीवन कधीही संपू शकते, हे विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत सोशल मीडियावर स्वतःची ओळख निर्माण केली. मिळत असलेले यश बघायला 'बाबा'नाही, ही सल विलासला आहे.
नवख्यांना येते निराशा कोणतेही यश एका दिवसात मिळत नाही. त्यात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. सोशल मीडिया हे असे माध्यम आहे. ते अपडाऊन होत राहते. इन्फ्लुएन्सर म्हणून अनेक जण कंटेट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, लोकांच्या पसंतीला पडत नाही. काम करूनही प्रसिद्धी मिळत नसल्याने नवख्यांना निराशा येत असल्याचे वास्तव आहे.
बक्कळ कमाई, पण एका दिवसात नाही सोशल मीडियावर नियमित दिसणाऱ्या अनेक इन्फ्लुएन्सरची कमाई लाखोंच्या घरात आहे. सेलिब्रिटी म्हणून त्यांना मोठमोठ्या कार्यक्रमात बोलावले जाते. पण हे यश त्यांना एका दिवसात मिळाले नाही. त्यासाठी सातत्य ठेवत लोकांना काय आवडते, त्यानुसार कंटेट दिल्यामुळे शक्य झाले आहे.
नवीन इन्फ्लुएन्सरना काय सल्ला "हा प्लॅटफॉर्म चांगला आहे. चांगले कंटेंट देऊन तुम्ही या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू शकता. प्रारंभी अडचणींसोबतच निराशाही येईल. कधी लाइक्सचा पाऊस पडेल तर कधी दुष्काळही येईल. आपण चांगले कंटेट कसे देऊ शकतो, याचा सातत्याने प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला जे आवडते ते केलेच पाहिजे. त्यातून मिळणारा आनंद हा पैसापेक्षा मोठा आहे." -विलास झट्टे, इन्फ्लुएन्सर, मारेगाव, यवतमाळ.