लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अनुकंपाधारक उमेदवारांना मागील अनेक महिन्यांपासून नोकरीची प्रतीक्षा होती. जिल्हा परिषद प्रशासनाने २०० अनुकंपाधारकांची ज्येष्ठता यादी तयार केली असून, त्यातील ११९ जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सामान्य प्रशासन विभागाने अंतिम यादी जाहीर केली आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचे निधन झाले. आधारवड कोसळल्याने अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. दुःखातून सावरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अनुकंपातून नोकरी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्जही करण्यात आले. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेत कधी नोकरी मिळणार याची प्रतीक्षा होती.
गेल्या वर्षी ९१ जणांना 19 अनुकंपाधारकांना नियुक्ती आदेश देण्यात आले होते. उर्वरित उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा होती. त्यानंतर २०० जणांची ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी अनुकंपाधारक उमेदवारांच्या नियुक्तीचा मुद्दा मिशन मोडवर घेतला. दोन दिवसांपूर्वीच सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. ज्येष्ठता यादीत शिक्षणानुसार उमेदवारांना पदासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. अनुकंपा पदभरतीत कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियंता (पाणीपुरवठा, बांधकाम विभाग), कनिष्ठ सहायक लेखा, वरिष्ठ सहायक लेखा, आरोग्यसेवक पुरुष ग्रामसेवक आदी पदांचा समावेश आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आधीच करण्यात आली आहे. त्यामुळे याच आठवड्यात अंतिम यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.
खासगीत काम करून सांभाळली जबाबदारी पालक जिल्हा परिषदेत कार्यरत असताना निधन झाल्याने कुटुंबाचा आधारवड कोसळला. यामुळे शिक्षण घेतल्यावर उमेदवारांना अनुकंपा नोकरीची प्रतीक्षा होती; मात्र कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी अनेकांनी खासगी काम करून जबाबदारी सांभाळली. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा काही काळ हा संघर्षाचा राहिला आहे. मात्र, आता सुखाचे दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
३२ परिचरांना मिळाली पदोन्नती जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या परिचरांच्या पदोन्नतीचा प्रश्न मागील काही वर्षांपासून रखडला होता. ही बाब सीईओ मंदार पत्की यांच्या लक्षात येताच त्यांनी आठ दिवसात पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढला. ३२ परिचरांना कनिष्ठ सहायक म्हणून पदोन्नती देत सोईनुसार पदस्थापनाही दिली.