यवतमाळ : शुक्रवारी रात्री यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. महागाव तालुक्यातील पैनगंगा व पूस नदीच्या संगमावरील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत. घटनास्थळी एसडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.
धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आनंदनगर या छोट्याशा खेड्यातील ४५ नागरिक पुरात अडकून पडले आहेत. हे हेलिकॉप्टर शनिवारी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास आनंदनगरात दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतला. ''आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. सुमारे २३१ मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.'' अशी माहिती ट्वीटरद्वारे दिली.
पुरातून मुलींना वाचविताना आईचा मृत्यू, यवतमाळातील वाघाडीची दुर्दैवी घटना
आनंदनगर हे महागाव तालुक्यातून वाहणाऱ्या पूस नदीपात्रातील एका छोट्याशा टेकडीवर वसलेले गाव आहे. अनंतवाडी या गटग्रामपंचायतीचाच आनंदनगर हा एक भाग आहे. परंतु पूस नदीचे पात्र आणि एका बाजूने मोठा नाला अशा जलाशयाने हे गाव वेढलेले आहे. इतरवेळी येथील नागरिक पाण्यातूनच एका छोट्या मार्गाने जाणे-येणे करतात. मात्र पावसाळ्यात त्यांचा जगाशी संपर्क तुटतो.
सध्या सुरु असलेल्या धुवाधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांपासून त्यांना बाहेर निघणे कठीण झाले आहे. या गावातही पुराचे पाणी घुसत आहे. समोर प्रचंड पुराचा धोका दिसत असताना या लोकांनी मदतीची याचना सुरू केली. त्यांना बाहेर काढण्यासाठी सरपंच श्रीराम कवाने, जगदीश राठोड, श्याम गाडेकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल चिकणे, यांनी हेलिकॉप्टरची मागणी केली होती. प्रशासनाने तातडीने हालचाली करून छत्तीसगडवरून हेलिकॉप्टर मागविले. शनिवारी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास हे हेलिकॉप्टर दाखल झाले. मात्र हेलिपॅड नसल्यानेही मोठा खोळंबा झाला. दरम्यान, एसडीआरएफच्या दोन तुकड्या पोहोचल्या असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे फिल्डवर पोहचून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.