यवतमाळ :
प्रेयसीला घेऊन एकांताच्या शोधात घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील प्रेमीयुगुल वाकी दुधाना शिवारात आले. एका पडीक शेतात दोघेही गुफ्तगु करू लागले. अचानक त्यांच्यात वाद झाला. तयारीनिशी आलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार केला. नंतर स्वत: झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली.
गजानन दत्ताजी ढोणे (२६) रा.बेलोरा असे मृत प्रियकराचे नाव आहे. कोमल (१८) (काल्पनिक नाव) रा.बेलोरा असे जखमी प्रेयसीचे नाव आहे. हे दोघेही दुचाकीने घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथून एकांताच्या शोधात वाकी दुधाना शिवारात आले. प्रेमात धोका दिला, याचा राग गजाननच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने सोबत चाकू व कटर आणले होते. गजाननने कोमलच्या गळ्यावर चाकूने वार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. नंतर तिच्या ओढणीने गजाननने झाडाला गळफास लावून घेतला. यात गजाननचा जागीच मृत्यू झाला, तर गतप्राण झालेली कोमल शिवारातून घराकडे जात असणाऱ्या मजुरांच्या निदर्शनास आली. त्यांनी वडगाव जंगल पोलिसांना घटनेची माहिती दिली. कोमलला वेळीच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ती वाचली. या गंभीर घटनेने मात्र परिसरात खळबळ निर्माण झाली.
घटनास्थळावर मुुलाची दुचाकी, मुलीची बॅग, धारदार चाकू व कटर आढळून आले. पोलिसांनी हे सर्व साहित्य ताब्यात घेतले. या प्रकरणात वृत्तलिहिस्तोवर पोलिसांनी कुठलीही नोंद घेतली नव्हती.
जखमी कोमल बोलण्यास असक्षमधारदार चाकूचा गळ्यावर वार झाला. यामुळे कोमलचे व्होकलकाॅड फाटले आहे. त्यामुळे तिला बोलता येत नाही. घटना नेमकी काय, कशावरून वाद झाला, याचा उलगडा झालेला नाही. तपास सुरू असून, योग्य माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे वडगाव जंगलचे ठाणेदार पवन राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.