यवतमाळ : शहरामध्ये चोरीच्या घटनांचे सत्र थांबायला तयार नाही. सोमवारी सायंकाळी आणि मध्यरात्री दोन चोरीच्या घटना घडल्या. एकाच दिवशी घडलेल्या या चोरीत २६ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी खुद्द पोलिस अधीक्षकांनी पाहणी केली. याशिवाय डॉग स्कॉड आणि ठसेतज्ज्ञांनी देखील पाहणी केली. हे चोरटे सुशिक्षित आणि सुजान असल्याने त्यांच्या चोरीच्या प्रयत्नावरून स्पष्ट होते. काही चोरट्यांचे फोटो सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
यवतमाळ शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून उज्ज्वलनगर भाग-३ ओळखला जातो. या ठिकाणी डॉ. रवींद्र गुलाबराव ठाकरे यांच्या घरी सायंकाळी ७ ते ९ च्या सुमारास ही चोरीची घटना घडली. ठाकरे दाम्पत्य काही कामानिमित्त बाहेर ठिकाणी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात शिरकाव केला. लोखंडी ग्रील तोडून घरामध्ये प्रवेश केला.
विशेष म्हणजे ज्या खोलीत सोन्याचे दागिने ठेवले होते त्याच कपाटातून चोरट्यांनी हे दागिने काढले. ३५० ग्रॅम सोने आणि ५०० ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि एक लाख रुपये नगदी असे २० लाख रुपयांंचे साहित्य चोरट्यांनी काही क्षणात लंपास केले. या ठिकाणी पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, उपविभागीय अधिकारी... यांच्यासह पोलिस विभागाचे पथक आणि डॉग स्कॉड ठसे तज्ज्ञ यांनी देखील या ठिकाणची पाहणी केली. मात्र चोरट्यांकडून कुठलाही पुरावा ठेवला नसल्याचे प्रथमदर्शनी पथकाला निदर्शनास आले.
हनुमान आखाडा चौकातील आकाश मॉलमध्ये मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या ठिकाणी वरच्या मजल्यावरून दुकानात त्यांनी प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या केबल कापण्यात आल्या. याशिवाय वीजप्रवाह देखील बंद करण्यात आला. त्यानंतर चोरट्यांनी महागडे कोट सूट, लाचा, जिन्स पॅन्ट आणि शर्ट असा साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला. याशिवाय दुकानातील तीनही कॅश कौंटरमध्ये ६५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी काढून नेली.
मोबाईलला हात लावला नाही
हे चोरटे अतिशय हुशार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दुकानात प्रवेश करतानाच त्यांचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र, नंतर सीसीटीव्हीचे कनेक्शन कापल्याने समोरील चित्र दिसत नाही. या ठिकाणी मोबाईल ठेवलेला होता. मोबाईल ट्रॅक होत असल्याने चोरट्यांनी या मोबाईलला हात लावला नाही. सीसीटीव्हीमध्ये दिसणारे तीन चोरटे तोंडाला रुमाल बांधून होते.
महागडेच कपडे चोरले
दुकानामध्ये असलेल्या इतर कपड्यांकडे चोरटे फिरकले नाही. त्यांनी महागडे कपडे आणि महागडा लाचा चोरला. यावरून चोरट्यांनी आधी दुकानाची पाहणी केली असावी आणि ग्राहक म्हणून दुकानात आले असतील असा संशय व्यक्त होत आहे तर दुसऱ्या चोरीमध्ये घरातून ज्या ठिकाणी सोन्याचे दागिने ठेवले होते, त्याच ठिकाणावरून चोरट्यांनी दागिने काढल्याने चोरटे घराच्या पाळतीवर असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आधीच्या दिवशी लग्नात वापरले होते दागिने
ठाकरे परिवार दोन दिवस आधी एका समारंभासाठी गेले होते. त्यावेळी दागिने वापरले होते. याच ठिकाणावरून चोरटे ठाकरे परिवाराच्या पाळतीवर असावे, असा संशय व्यक्त होत आहे.