दिग्रस (यवतमाळ) : येथील एसटी महामंडळाच्या आगारात उभ्या असलेल्या बसेसमधील डिझेलची चोरी होत असल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री उघडकीस आला. बसेसची स्वच्छता करण्याची जबाबदारी असलेल्या एका खासगी कामगाराने हा प्रकार केला. या प्रकरणात आगाराच्या सुरक्षारक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून दिग्रस पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
श्रीहरी गणेश पाटील (रा. देउरवाडा) असे या आरोपीचे नाव आहे. दिग्रस आगारात बसेसच्या स्वच्छतेसाठी खासगी स्वच्छता कर्मचारी म्हणून श्रीहरी पाटील याची नियुक्ती करण्यात आली होती. या स्वच्छता कर्मचाऱ्याने नेहमीप्रमाणे रविवारी रात्री १२:०० वाजताच्या सुमारास एसटी बसेसची स्वच्छता केली. त्यानंतर तो आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच २९ एक्स ४०९१) घरी जाण्यास निघाला. परंतु, त्याच्या हालचालीवरून आगाराचे सुरक्षारक्षक दिलीप नारायण तायडे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी तपासणीसाठी म्हणून स्वच्छता कर्मचाऱ्याला अडवले. मात्र, तो तपासणीसाठी टाळाटाळ करीत होता.
अशातच त्याने दुचाकीसह पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुसरा सुरक्षारक्षक गडकर याच्यासह दिलीप तायडे यांनी श्रीहरीला पकडून यांत्रिकेच्या मार्फत त्याच्या दुचाकीची तपासणी केली. त्यावेळी दुचाकीच्या डिकीत डिझेलने भरलेल्या एक लिटरच्या ३ बॉटल व दोन लिटरच्या २ बॉटल आढळून आल्या. महामंडळाच्या बसेसमधील ७ लिटर डिझेल इंधनाची चोरी करताना आढळून आल्याने सुरक्षारक्षक दिलीप तायडे यांनी दिग्रस पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी श्रीहरी पाटील (रा. देउरवाड़ा) याच्या विरोधात कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनात दिग्रस पोलिस करीत आहेत.