लोकमत न्यूज नेटवर्क वणी : पांढरकवडा येथील पोलीस निरीक्षक अस्लमखान यांच्या येथील निवासस्थानी चोरी होऊन चोरट्यांनी घरातून १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, अशी तक्रार अस्लमखान यांचे चिरंजीव नदीम अस्लमखान यांनी वणी पोलीस ठाण्यात शुक्रवारी दाखल केली. ही चोरीची घटना ३ जूनपूर्वी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शुक्रवारी ३० जूनला पुन्हा चोरीचा प्रयत्न झाल्याने ३ जूनपूर्वी घडलेली चोरीची घटना उजेडात आली. दोन वर्षांपूर्वी अस्लमखान हे वणी येथे कार्यरत होते. स्थानिक पोलीस वसाहतीतच त्यांचे निवासस्थान आहे. त्यानंतर ते मुकूटबन व तेथून त्यांची अलिकडे पांढरकवडा येथे बदली झाली. मात्र येथील निवासस्थान त्यांच्याच ताब्यात आहे. सध्या निवासस्थानात त्यांचा मुलगा वास्तव्याला होता. तो शिक्षणासाठी भद्रावती येथून ये-जा करीत होता. या दरम्यान, घरी कुणी नसताना ३ जूनच्या पूर्वी अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून घरात ठेऊन असलेले २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, २० ग्रॅम वजनाचा सोन्याचे नाणे, चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, घड्याळ व दोन मोबाईल व रोख एक हजार २०० रुपये लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार मुकूंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गालाल टेंबरे हे करीत आहेत.
पांढरकवडा ठाणेदाराच्या वणीतील बंगल्यात चोरी
By admin | Published: July 02, 2017 1:40 AM