रितेश पुरोहित - महागाव तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि प्रचंड गारपिटीने दुष्काळ निर्माण झाला. शासनाने दुष्काळग्रस्तांना मदतही दिली. मात्र विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळाच दित नाही. २६ हजार शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरल्यानंतरही एकाही शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळाला नाही. महागाव तालुक्यात गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला. ११६० मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने शेतात १५ ते २० दिवस गुडघाभर पाणी साचले होते. नदी-नाल्यांना आलेल्या पुरात शेकडो हेक्टरवरील पीक वाहून गेले. तर मार्च-एप्रिल महिन्यात प्रचंड गारपीट होऊन रबी हंगाम उद्ध्वस्त झाला. तालुक्यातील शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला. शासनाने या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. पीक आणेवारीही ५० टक्क्याच्या आत आली. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला. परंतु हा दुष्काळ विमा कंपनीच्या लेखी दिसतच नाही. अद्याप एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.महागाव तालुक्यात ६० हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. त्यात कापूस २४ हजार हेक्टर, सोयाबीन २२ हजार हेक्टरचा समावेश होता. यापैकी २६ हजार शेतकऱ्यांनी ३५ हजार हेक्टर क्षेत्रफळाचा पीक विमा उतरविला होता. त्यात कापूस २० हजार हेक्टर, सोयाबीन दहा हजार हेक्टर आणि इतर पाच हजार हेक्टरचा समावेश होता. विमा हप्तापोटी शेतकऱ्यांनी ६० लाख रुपये तर शासनाने ६० लाख असे एक कोटी २० लाख रुपये इंडिया इन्शूरन्स कंपनी मुंबईकडे भरणा केला. दुष्काळी परिस्थितीत विमा कंपनीकडून पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु आता खरीप हंगाम आला तरी एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. प्रचंड नुकसान होऊनही विमा कंपनी शेतकऱ्यांना त्यांचा लाभ देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. शासकीय दप्तरी दुष्काळ असला तरी विमा कंपनी मात्र त्यावर बोलायला तयार नाही. विमा कंपनीवर कुणाचाच अंकुश नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. जणू पीक विमा कंपनीच्याच फायद्याची ठरत आहे.
विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळच नाही
By admin | Published: June 14, 2014 11:54 PM