पुसद : येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या गावातील ग्रामपंचायतीलाच ग्रामसेवक नाही. मागील चार महिन्यांपासून प्रभारावर गाडा हाकला जात असल्याने गावाच्या विकासाला खीळ बसली आहे.
ग्रामसेवक हा त्या गावाचा विकासाचा कणा असतो. परंतु तालुक्यातील असोली ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक झाल्यापासून आजपर्यंत पूर्णवेळ ग्रामसेवक मिळाला नाही. त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांपुढे ग्रामविकासाचे प्रश्न उभे ठाकले आहे. यावर्षी निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडी पॅनलचे उमेदवार निवडून आले. ग्रामपंचायतीत सत्ताबदल झाला. नवख्या आघाडीच्या पुष्पा सुभाष कोल्हे सरपंच झाल्या. तेव्हापासून गावात कोणत्या ना कोणत्या कारणाने नवीन सदस्यांचे खच्चीकरण सुरू आहे.
असोली येथील सचिवाचा प्रभार भाऊ हिंगाडे यांच्याकडे देण्यात आला आहे. परंतु त्यांनी चार महिन्यांपासून साधे खाते बदलही केला नाही. त्यामुळे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी वारंवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून किंवा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, चार महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांना फिरवले जात आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना सुविधा देण्यास पदाधिकारी असमर्थ ठरत आहे.
बॉक्स
ग्रामसेवकांचा रुजू होण्यास नकार
सरपंचांनी गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक देण्याची मागणी केली. त्यांनी पाच ग्रामसेवकांची ऑर्डर केली, परंतु एकही ग्रामसेवक रुजू होण्यास तयार नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे गाव असूनसुद्धा ग्रामसेवक गावात रुजू व्हायला तयार नाही, हे दुर्दैव आहे.
कोट
कायस्वरूपी ग्रामसेवक नसून प्रभारी असल्याने विकास कामांना खीळ बसली. नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांच्या आत कायमस्वरुपी ग्रामसेवक न दिल्यास नागरिकांना घेऊन जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.
पुष्पा सुभाष कोल्हे, सरपंच असोली
कोट
सरपंचासह गावातील काही नवीन पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत खाते उघडू दिले नाही. जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. सीईओंशी लवकरच चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावतो.
- प्रवीणकुमार वानखेडे,
गटविकास अधिकारी, पुसद