(फोटो)
किशोर वंजारी
नेर : निकृष्ट आहाराबाबत येथील बालविकास प्रकल्प अधिकारी सुनीता बनसोड यांनी वरिष्ठांसह कंपनीकडे तक्रार केली. तरीही नुकतेच आलेले धान्य व तिखट निकृष्ट आहे. यामुळे संबंधित कंपनीला कुणाचे अभय आहे याची चौकशी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. तालुक्यात १७६ अंगणवाडीत शेकडो बालके येतात. या बालकांना आहार म्हणून तांदूळ, मूगडाळ, चणाडाळ, चटणी देण्यात येते. काही महिन्यांपूर्वी मूगडाळ व तांदूळ निकृष्ट येत असून खाण्यायोग्य नसल्याची तक्रार मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कठाडे यांनी केली होती. यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सदर आहार निकृष्ट असल्याची तक्रार केली होती. अमरावतीच्या लॅबला तपासणीसाठी नमुना पाठवला होता. अद्यापही त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. यानंतर २८ ऑगस्ट रोजी आहाराचे वाटप झाले. शुक्रवारी या धान्याची पाहणी केली असता चटणीत चक्क भुसा आढळला. सदर तिखट लाल नसून पिवळे हळदीसारखे आहे व बेचव आहे. यातच मूगडाळ ही निकृष्ट आहे. खुद्द काही महिलांनी सदर धान्य व मिरचीपूड दाखवले. गोरगरीब मुलांच्या आरोग्याशी खेळ चालवला आहे. प्रशासनाने हा प्रकार थांबवावा अन्यथा पालक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
कोट
हे धान्य निकृष्ट असून खाण्यायोग्य नसल्याची तक्रार मी संबंधित कंपनीकडे केली आहे. तांदूळ व मूगडाळ सॅम्पल अमरावती येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहे.
- सुनीता बनसोड, प्रभारी बाल प्रकल्प अधिकारी, नेर
कोट
बालकांच्या आरोग्याशी कंपनीने खेळ चालवला आहे. जनावरेही असे निकृष्ट धान्य खात नाही. चटणीत तर लाकडाचा भुसा आहे. हा प्रकार त्वरित थांबवावा. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल.
- बाळासाहेब कठाडे, मनसे तालुकाध्यक्ष, नेर