लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डुबली पोड (ता. मारेगाव) येथील मनोज गणपत टेकाम या युवकाच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करावी, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी बिरसा क्रांतीदलाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांना बिरसा क्रांतीदलाचे राज्य महासचिव प्रमोद घोडाम यांच्या नेतृत्वात मृताची बहीण मिरा सुरेश आत्राम यांनी निवेदन दिले. मनोज टेकाम या युवकाचा १८ फेब्रुवारी रोजी संशयास्पद मृत्यू झाला. मनोज टेकाम व भालचंद्र वामन झोटिंग यांनी भागीदारी तत्वावर झोटिंग यांच्या शेतात गव्हाची लागवड केली होती. मनोज १८ फेब्रुवारीला या शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेला होता. परंतु रात्र झाल्यावरही तो परत आला नाही. घरच्यांनी झोटिंग यांना विचारले असता तो आताच गेला असे सांगितले. गव्हात पाणी सुरू आहे, वीज प्रवाह सुरू आहे, असे सांगून त्यांनी शेतात शोध घेण्यास मनाई केल्याचे निवेदनात म्हटले आहे.त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी गावातील परमेश्वर पुरुषोत्तम जुनगरी हा गायी चारत असताना त्याला नाल्याजवळ मनोज टेकामचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. विशेष म्हणजे, याच ठिकाणी आधी गावकºयांनी पाहणी केली तेव्हा मृतदेह आढळला नव्हता. त्यामुळे शंका आल्याने मारेगावच्या ठाणेदारांकडे या घटनेबाबत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तेथेच उत्तरीय तपासणी करण्यात आली. तेथेच मृतदेह दफन करण्यात आला. पोलिसांना चौकशीदरम्यान त्या ठिकाणी मृताचा मोबाईल आढळला नव्हता. मात्र काही दिवसांनी त्याच ठिकाणी गावातील पोतू चंडकू आत्राम याला तेथे मोबाईल आढळला, असे निवेदनात म्हटले आहे.बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी, महाराष्ट्र संयोजक वसंत कनाके, जिल्हाध्यक्ष प्रा. कैलास बोके, विदर्भ संघटक अतुल कोवे यांनी १ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. महिना लोटूनही दोषींवर कारवाई न झाल्यामुळे १० दिवसात पोलीस प्रशासनाने चौकशी करुन आरोपींना अटक न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य महासचिव प्रमोद घोडाम यांनी दिला आहे. शिष्टमंडळात बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. कैलास बोके, जिल्हा सचिव लक्ष्मण पंधराम, संजय मडावी, मारेगाव शाखेचे अध्यक्ष अनिल गेडाम, बाबूलाल सिडाम, सोनबा सुरपाम, सतू आत्राम, रामा टेकाम, मिरा टेकाम, संगीता बोसे, अंबादास बोसे आदी उपस्थित होते.
युवकाच्या संशयास्पद मृत्यूची महिनाभरानंतरही पोलीस चौकशी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:29 PM
डुबली पोड (ता. मारेगाव) येथील मनोज गणपत टेकाम या युवकाच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करावी, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी बिरसा क्रांतीदलाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली.
ठळक मुद्देयवतमाळात धडक : बिरसा क्रांतिदलाचा आंदोलनाचा इशारा