गावात विविध समस्या : शासनाविरूद्ध तीव्र रोष, माकोडा पोडाला घनदाट जंगलाचा वेढा पांढरकवडा : तालुक्यातील मांगुर्डा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल व जंगलाने वेढलेल्या माकोडा पोड या कोलाम वस्तीसाठी स्वातंत्र्यानंतरही गावाकडे जाण्यास रस्ताच नाही. विशेष म्हणजे माकोडा हे गाव गेल्यावर्षी महामहीम राज्यपालांनी दत्तक घेतले होते. दुर्गम भागातील माकोडा पोड या गावाला जाण्यासाठी रस्ता निर्माण करून मुलभूत सुविधा देण्याचे कुणालाही गरज नसल्याचे यावरून दिसून येत आहे. गावात शिरण्यासाठी ग्रामस्थांना चिखल तुडवत जावे लागते. त्यातच हिंस्त्र प्राण्यांचीसुद्धा भिती असते. या गावात जाताना मधात एक नाला आहे. तो पावसाळ्यात तुडूंब भरून वाहतो. त्यामुळे ग्रामस्थांना घराकडे जाताच येत नाही. पूर उतरेपर्यंत त्यांना जंगलातच थांबावे लागते. माकोडा पोड या गावाची लोकसंख्या ११० असून १०० टक्के कोलाम सजामाचे नागरिक वास्तव्यास आहे. या समाजबांधवांच्या अज्ञान व अंध:कारपणाचा लोकप्रतिनिधी लाभ घेऊन मुलभूत सुविधापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. एकीकडे रेल्वे मार्गासाठी कोट्यवधी रूपये मंजूर केले जातात, तर दुसरीकडे पायदळ चालण्यासाठीदेखिल सुविधा मिळत नाही, यालाच ‘अच्छे दिन’ म्हणतात काय? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहे. प्राथमिक शिक्षणाची सुविधा वगळता या गावात एकही सुविधा नाही. अंगणवाडी केंद्राची इमारत नसल्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. पिण्याच्या पाण्याची जी विहीर आहे, तीसुद्धा नाल्याच्या समोर आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे गावात जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नसल्यामुळे माकोडावासीय संतप्त झाले आहे. राज्यपालांनी माकोडा गाव दत्तक घेतल्यानंतर ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या होता. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनही साधा रस्ता उपलब्ध करून न दिल्यामुळे दत्तक गाव योजना कुणाच्या कामाची? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन गावातील समस्या सोडवाव्या, अशी मागणी माधव मेश्राम, भिमा टेकाम, गुलाब टेकाम, सुरेश आत्राम आदींसह गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
राज्यपालांच्या दत्तक गावात रस्ताच नाही
By admin | Published: August 17, 2016 1:06 AM