विठ्ठलराव जाधव : पुसद अर्बन बँकेला विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट पुसद : व्यापाऱ्यांच्या मनात सुरक्षितेची भावना जागृत होण्यासाठी मार्केट लाईनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येईल. पोलीस आणि जनता यांच्यात मैत्रीपूर्ण भावना जागृत करण्याची गरज आहे. तेव्हा सुरक्षितेची भावना निर्माण होईल. सौदार्ह आणि मैत्री भाव वृद्धींगत झाल्यावरच समाजमन प्रफुल्लीत राहील असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी व्यक्त केले. येथील पुसद अर्बन को-आॅप. बँकेला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार केला. तसेच चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने अध्यक्ष सुरज डुब्बेवार यांनी जाधव यांचा सत्कार केला. जाधव म्हणाले, पुसद अर्बन सामाजिक बांधिलकी जोपासत जनसेवेचे कार्य करीत आहे. ही खरोखर अभिमानास्पद बाब आहे. राज्यभर बँकेचे जाळे पसरले असून आज बँकेकडे १ हजार कोटींच्या ठेवी असणे म्हणजे लोकांच्या विश्वासाला खऱ्या अर्थाने बँक पात्र ठरली आहे. या शब्दात पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी पुसद अर्बन बँकेचा गौरव केला. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, प्रभारी डीवायएसपी सदानंद मानकर, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन शेळके, ग्रामीणचे ठाणेदार धनंजय जगदाळे, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी जगदेवराव आखरे यांचाही बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी सत्कार केला. चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने विठ्ठलराव जाधव यांना निवेदन देण्यात आले. पुसद शहरातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था पाळण्यासाठी पोलीस विभागाला सहकार्य करावे, त्यातून पोलीस आणि जनतेची मैत्री दृढ होईल असे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव म्हणाले. यावेळी सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मान्यवरांसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
पोलीस आणि जनता यांच्यात मैत्रीपूर्ण भावना असावी
By admin | Published: August 17, 2016 1:12 AM