आर्णी : मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख ५७ हजार क्विंटल कापूस खरेदी झालेल्या आर्णी तालुक्यात यावर्षी अद्यापही शासनाने कापसाची खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चांगलाच रोष व्यक्त होत आहे. आर्णी तालुक्यात ९० टक्के शेतकरी हा कापूस उत्पादक असताना शासकीय खरेदी यावेळी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी व्यापारी अत्यंत कमी भावात कापूस घेऊन शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने कापूस खरेदी सुरू करावी यासाठी २०० हून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पणनच्या यवतमाळ येथील विभागीय कार्यालयाला देण्यात आले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शासकीय कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही शासनस्तरावर अद्याप ही बाब गंभीरतेने घेतलीच गेली नाही. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती व खासगी बाजार समिती फेडरेशनचे प्रतिनिधी आदींची तालुकास्तरावर एक संयुक्त बैठकही घेण्यात आली. परंतु या बैठकीत योग्य तोडगा निघालेला नाही. युवक काँग्रेसच्यावतीने याबाबत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या सर्व बाबी शेतकरी विरोधात होत असताना तालुक्यातील व जिल्ह्यातील जबाबदार पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे लक्ष देण्यास तयार नाही. (शहर प्रतिनिधी)एसडीओंचा अल्टीमेटमआर्णी येथे कापूस खरेदीबाबत खासगी बाजार समितीकडून मनमानी सुरू आहे. शासकीय बाजार समितीकडे स्वत:चे जिनिंग नाही. गुरुवारी उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी आर्णी येथे भेट देऊन याबाबत तत्काळ निर्णय घ्या व मला उद्या कळवा अन्यथा याबाबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचे संकेत दिले.
आर्णीत अद्यापही कापूस खरेदी नाही
By admin | Published: November 20, 2015 2:57 AM