लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. दररोज दोन-तीन डझन रुग्णांची, तर कधी एक-दोन मृत्यूची भर पडते आहे. म्हणून कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार, २५ जुलैपासून पुढील सात दिवस यवतमाळ शहर व पांढरकवडा शहरात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे गुरुवारी यवतमाळच्या बाजारपेठेत नागरिकांनी जीवनावश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी मरणाची गर्दी केली होती. मेनलाईनमधील सावकारपेठेत तर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.
मारवाडीपुरा, बालाजी चौक, टांगा चौक, आर्णी रोड, दत्त चौक, इंदिरा गांधी मार्केट, नेताजी चौक या प्रमुख बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. शुक्रवारीसुद्धा यापेक्षाही आणखी गर्दी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये केवळ दवाखाने व औषधी केंद्र सुरू राहणार असून दूध विक्रेत्यांना काही तासांची सवलत राहणार आहे.
इतर सर्वकाही बंद राहणार असल्याने गुरुवारीच खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. एकीकडे कोरोना रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे, तर दुसरीकडे त्याच उपाययोजनांच्या भीतीने बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी करीत गर्दी होत आहे. त्यामुळे या उपाययोजनांचा नेमका उपयोग किती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.