संसार उघड्यावर : पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीमदिग्रस : शहरातील खुल्या ले-आऊटवर अतिक्रमण घरे बांधणाऱ्यांना नगरपरिषदेने गुरुवारी दणका दिला. अतिक्रमण हटाव मोहीम राबवून २८ घरे पाडण्यात आली. यात घंटीबाबानगर येथील १७, अंबिकानगर ५, शास्त्रीनगर शाळेच्या आवारातील ६ घरांचा समावेश आहे.काही नागरिकांच्या तक्रारीवरून मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविली. गुरुवारच्या कारवाईनंतर शुक्रवारीदेखील भारतनगर येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक योगेश दंदे यांच्यासह पोलीस ताफा तैनात होता.दिग्रसमध्ये खुल्या ले-आऊटच्या जागी अनेकांनी घरे बांधली होती. याबाबत नागरिकांच्या तक्रारी नगरपरिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या. अतिक्रमणधारकांकडून त्रास होत असल्याचे तक्रारींमध्ये नमूद आहे. त्यावरून अतिक्रमण हटाव मोहीम पोलीस बंदोबस्तात मुख्याधिकारी टाले यांनी राबविली. उर्वरित अतिक्रमणे टप्प्या टप्प्याने हटविणे सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्यांनी आपले अतिक्रमण स्वत: काढून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. या मोहिमेमुळे अतिक्रमण करून राहणाऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणीदेखील काही नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)
खुल्या ले-आऊटमधील २८ घरे पाडली
By admin | Published: May 22, 2016 2:12 AM