पुसद (यवतमाळ) : काका-पुतण्यांची जोडी १४ जूनच्या रात्री बंदूक घेऊन वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी गेली. मात्र किर्र अंधारात शिकार करताना काकाच्या हातून पुतण्यालाच गोळी (छर्रा) लागली. फेट्रालगतच्या जंगलात घडलेल्या या थरारक घटनेत अखेर काकाविरुद्ध खंडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
खंडाळा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेट्रा गावातील बाळू पांडुरंग कुरुडे व श्याम अनिल कुरडे हे काका-पुतणे जंगल परिसरात शिकारीसाठी बारा बोरची मोठी बंदूक घेऊन गेले होते. रात्रीच्या अंधारात शिकार दिसताच काकाने बंदुकीतून फायर केले. मात्र नेम चुकून पुतण्या श्याम अरुण कुरडे याला बंदुकीतून सुटलेले छर्रे लागले. छर्रे पाठीत व पोटात घुसल्यामुळे तो गंभीर जखमी होऊन कोसळला. मात्र घाबरलेल्या काकाने असा बनाव केला की, अज्ञात मारेकऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला. तशी फिर्याद खंडाळा पोलिसात दिली.
पोलिसांनी जखमीला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, नंतर जखमी शाम कुरडेचा भाऊ करण अनिल कुरडे याने १५ जून रोजी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०८, सहकलम ३/२५ आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडाळा पोलिसांनी आरोपीस १६ जून रोजी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती खंडाळाचे पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी दिली.