लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात व तालुक्यात सातत्याने घरफोडी व चोरीचे गुन्हे घडतात. सात महिन्यात जबरी चोरीचे १३ गुन्हे, घरफोडीच्या ३७ घटना तर चोरीचे १८० गुन्हे दाखल झाले. यातील घरफोडीच्या गुन्ह्यात केवळ सात टक्के मुद्देमाल पोलिसांना हस्तगत करण्यात आला आहे. जबरी चोरीतील ५० टक्के मुद्देमाल मिळाला आहे. तर चोरीच्या गुन्ह्यातील ५६ टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. बरेचदा चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना चोर तत्काळ सापडून जातो, मात्र त्यातील मुद्देमाल मिळत नाही. चोर-पोलिसांचा हा खेळ सातत्याने सुरू असतो. जोपर्यंत चोरीचा मुद्देमाल मिळत नाही तोपर्यंत चोराला न्यायालयात दोषी ठरविणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरही लवकरच कारागृहाबाहेर पडतात.
लूट लाखोंची...
अडीच लाखांची वाटमारीयेथील आर्णी मार्गावर होमगार्ड कार्यालयाजवळ सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या युवकाला पाच आरोपींनी थांबवून चाकूचा धाक दाखवित अडीच लाख रुपयांची रोख रक्कम उडविली. हा गुन्हा अद्यापही उघडकीस आलेला नाही.
महिलांची टोळी जेरबंद येथील दत्त चौकातील ज्वेलर्सच्या दुकानात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून रोख रक्कम काढण्यात आली होती. या गुन्ह्याचा अवधूतवाडी पोलिसांनी शोध लावला. चोरी करणाऱ्या पाच महिलांची टोळीच जेरबंद केली. त्यांच्याकडून इतर गुन्हे उघड झाले नाही.
११ आरोपी अटक होऊनही मुद्देमाल मिळाला नाही येथील पांढरकवडा रोडवर घरात दरोडा टाकण्यात आला. या गुन्ह्यात २८ हजारांचा मुद्देमाल चोरी गेला. पोलिसांनी हा गुन्हा उघड केला. यात ११ आरोपींना अटकही झाली. मात्र चोरी गेलेला मुद्देमाल अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गुन्हा उघड होऊनही मुद्देमालाचा शोध कायम आहे.
५६ टक्के मुद्देमाल आणण्यात यश
चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यावर भर दिला जातो. गुन्ह्याची कबुली मिळूनही पोलीस तपास थांबत नाही. याची टक्केवारी आणखी वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. - डाॅ. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक