लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तुम्ही चोरीच्या वेगवेगळ्या आणि आश्चर्यात टाकणाऱ्या घटना ऐकल्या असतील, वाचल्या असतील. अशीच एक घटना वणीत घडली असून चोरट्याने चोरीचा माल पळवण्यासाठी चोरीचेच वाहन वापरल्याचे समोर आले आहे.
सोमवारी मध्यरात्री स्थानिक गांधी चौकातील धान्याचे गोदाम फोडल्यानंतर चोरीचा तांदूळ पळविण्यासाठी चक्क चारचाकी वाहन चोरले. मात्र, पोलिसांनी केलेल्या वेगवान हालचालीनंतर कुख्यात गब्या उर्फ मोहम्मद नावेद मो. कदीर (३९) याला बेड्या ठोकण्यात यश आले. ही कारवाई मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
चौर्यकर्मात निष्णात असलेला मोहम्मद नावेद उर्फ गब्या मो. कादीर याच्या अटकेनंतर गेल्या काही महिन्यांत वणी भागात झालेल्या चोरीच्या घटनांचाही उलगडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी रात्री मोमीनपुरा भागातील रहिवासी असलेल्या कुख्यात गब्याने गांधी चौकातील पुनित खत्री यांच्या मालकीचे ओम किराणा स्टोअर्सचे गोडाऊन फोडले. यातून त्याने ३० किलो वजनाचे तांदळाचे सात कट्टे बाहेर काढले.
तत्पूर्वी त्याने मोमीनपुरा भागातीलच रिझवान शेख यांच्या मालकीचे माल वाहतूक करणारे (एम.एच.२९-टी.३४१६) वाहन चोरले. त्या वाहनात गोदामातील तांदळाचे कट्टे टाकण्यात आले. कुणाला संशय येऊ नये, यासाठी गब्याने त्या कट्ट्यावर लोखंडी भंगार ठेवले. दरम्यान, वाहन चोरीप्रकरणी रिझवान शेख यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर होती. सकाळी ११ वाजताच्या सुमारास कुख्यात गब्या एका वाहनातून संशयास्पद साहित्य शिरपूर मार्गाने घेऊन जात असल्याची टिप ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे व डीबी पथकाला या मार्गाने रवाना केले. या मार्गावर असलेल्या एका बारसमोर हे वाहन उभे होते.
पोलिसांना पाहताच, गब्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. या कारवाईत तांदळाचे सात कट्टे, भंगाराचे साहित्य व वाहन, असा ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, एपीआय माया चाटसे, हवालदार सुदर्शन वानोळे, हरविंदर भारती, अविनाश बनकर यांनी केली.